काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे काही नेते सहमत मात्र काहींची असहमती, दिल्या सावध प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:24 IST2021-07-01T04:24:48+5:302021-07-01T04:24:48+5:30
मी त्यांच्या मताशी सहमत नाही - माजी खासदार बापू चौरे माजी खासदार बापू चौरे यांनी सांगितले की, सुशीलकुमार शिंदे ...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे काही नेते सहमत मात्र काहींची असहमती, दिल्या सावध प्रतिक्रिया
मी त्यांच्या मताशी सहमत नाही - माजी खासदार बापू चौरे
माजी खासदार बापू चौरे यांनी सांगितले की, सुशीलकुमार शिंदे म्हणतात तशी परिस्थिती नाही. मी त्यांच्या मताशी सहमत नाही. पण पक्षात काही प्रमाणात उदासीनता आहे. ही उदासीनता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या माध्यमातून भरून निघेल, असा मला विश्वास आहे. आता कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे देशाला चालवत आहेत त्याप्रति लोकांमध्ये नाराजी आहे. याचा फायदा भविष्यात कॉंग्रेसला होईल. आज जिल्ह्यात कॉंग्रेसचे आमदार कुणाल पाटील आणि साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळा गावीत यादेखील कॉंग्रेसच्या प्रयत्नांमुळेच निवडून आल्या आहेत. येणारा काळ कॉंग्रेसचाच असेल.
वैचारिक चळवळ शिबिर होत नाही, ही वस्तुस्थिती - जिल्हाध्यक्ष शाम सनेर
कॉंग्रेसमधील वैचारिक चळवळ सुरू ठेवण्यासाठी घेण्यात येणारी शिबिरे आता होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पक्षात विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी आधी शिबिरे होत होती. परंतु काळानुरूप सर्व बदल होत असतो. आता सोशल मीडियावरुन विचाराची देवाण - घेवाण हाेत असते. मात्र सोशल मीडियावर होणारी वैचारिक चर्चा ही काहीवेळेस वस्तुस्थितीला धरून नसते. त्यामुळे सोशल मीडियावरदेखील कॉंग्रेसचा इतिहास आणि परंपरांची माहिती युवकांना करून देण्यासाठी पक्षाने सोशल मीडियावर एक गट तयार करावा, जो हे काम करू शकेल.
शिंदे यांच्या मताशी आपण सहमत - प्रदेश सरचिटणीस प्रकाश सोनवणे
ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मांडलेल्या विचारांशी आपण सहमत आहोत. कारण आधी पक्षात कार्यकर्त्यांची व्यथा ऐकून घेण्यासाठी वैचारिक शिबिरे होत होती, हे खरे आहे. अशा शिबिरांमध्ये पक्षाबाहेरील विचारवंत लोकांना बोलविले जात होते. मग त्यांच्याशी कार्यकर्ते चर्चा करीत असत. अशा पद्धतीने पक्षात कार्यकर्त्यांसोबत बौद्धिक विचारमंथन होत होते. मात्र आता ही संस्कृती लोप पावली आहे.
कोरोनामुळे शिबिरे बंद झालीत - युवराज करनकाळ
मी विद्यार्थी चळवळीत एनएसयूआयच्या माध्यमातून कॉंग्रेससोबत आहे. पक्षाची १२५ वर्षांची जुनी परंपरा आहे. आधी पक्षात वैचारिक शिबिरे घेतली जात होती. परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे आपण घरातील व्यक्तीपासून लांब राहतो. मग अशा परिस्थिती पक्षाची शिबिरे कशी होऊ शकतात. यामुळेच शिबिरे होत नाहीत. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर पक्षात अशी शिबिरे होतील.