तर १५ वर्षात होईल १०० टक्के लसीकरण... खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी लागणार,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:38 IST2021-02-11T04:38:04+5:302021-02-11T04:38:04+5:30

२६ दिवसात ९ हजार २०० जणांनी घेतली लस धुळे - जिल्ह्याने कोरोना लसीकरणात आघाडी घेतली आहे. मात्र लसीकरणासाठी एवढीच ...

So 100 percent vaccination will be done in 15 years ... Private hospitals will have to help, | तर १५ वर्षात होईल १०० टक्के लसीकरण... खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी लागणार,

तर १५ वर्षात होईल १०० टक्के लसीकरण... खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी लागणार,

२६ दिवसात ९ हजार २०० जणांनी घेतली लस

धुळे - जिल्ह्याने कोरोना लसीकरणात आघाडी घेतली आहे. मात्र लसीकरणासाठी एवढीच कुमक असली व याच वेगाने लसीकरण जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हायला १५ वर्षांचा कालावधी लागेल. त्यामुळे लसीकरण पूर्ण करायचे असेल तर खासगी रुग्णालयांची मदत महत्त्वाची ठरणार आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. मागील २६ दिवसात ९ हजार २०० जणांना लस टोचण्यात आली आहे. प्राप्त लक्ष्यापैकी ५३ टक्के लसीकरण पूर्ण करीत जिल्हा राज्यात आघाडीवर आला आहे. एका दिवसात सरासरी ३५४ जणांना लस टोचण्यात आली आहे. जिल्ह्यातील २० लाख लोकांचे लसीकरण करायचे असेल तर सद्याच्या लसीकरणाच्या वेगानुसार १५ वर्षे लागतील. जर वेगात लसीकरण पूर्ण करायचे असेल तर खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी लागणार आहे. तसेच लसीकरणाचे केंद्रे वाढवावी लागतील.

सहा केंद्रांवर लसीकरण -

जिल्ह्यात सहा ठिकाणी कोरोनाचे लसीकरण सुरू आहे. त्यात धुळे शहरात तीन केंद्रे आहेत. धुळे शहरातील केंद्रांमध्ये जिल्हा रुग्णालय, महानगरपालिकेचे प्रभातनगर आरोग्य केंद्र व मच्छीबाजार परिसरातील आरोग्य केंद्राचा समावेश आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय शिरपूर, ग्रामीण रुग्णालय साक्री व उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा याठिकाणी कोरोनाची लस टोचण्यात येत आहे.

९ हजार २०० जणांनी घेतली लस -

जिल्ह्यात आतापर्यंत ९ हजार २०० जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शासकीय व खासगी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस टोचून घेतली आहे. लसीकरणाच्या एकूण लक्ष्यापैकी ५३ टक्के लक्ष पूर्ण केले असून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पोलीस कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात येणार आहे. ५ हजार ५०० कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे.

आयएमएचा पुढाकार, पंतप्रधानांना पत्र -

लसीकरण पूर्ण करायचे असेल तर खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी आयएमएच्या राष्ट्रीय संघटनेने पुढाकार घेतला आहे. लसीकरण मोहिमेत खासगी रुग्णालयांचाही सहभाग करून घ्यावा, अशी विनंती शासनाला केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना याबाबत पत्रही लिहिले आहे. मात्र त्यांना अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली तर कमी वेळेत अधिक नागरिकांना लस टोचण्यास मदत होईल.

खासगी रुग्णालयांच्या सहभागाशिवाय पूर्ण लसीकरण करणे शक्य नाही. पल्स पोलिओ व इतर लसीकरणात खासगी रुग्णालयांची मदत घेतली जाते. त्याचप्रमाणे कोरोना लसीकरणातही खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी. याबाबत संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

- डॉ. रवी वानखेडकर, माजी राष्ट्रीय अध्यक्ष आयएमए

जिल्ह्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे लसीकरण सद्या सुरू आहे. ५ हजार ५०० पोलीस कर्मचाऱ्यांची माहिती संकलित झाली आहे. सर्व नागरिकांच्या लसीकरणाबाबत शासनाकडून कोणतीही सूचना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे एकूण लसीकरणासाठी किती कालावधी लागेल ते सांगता येणार नाही.

- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: So 100 percent vaccination will be done in 15 years ... Private hospitals will have to help,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.