तीन हजार घरांना बसविले स्मार्ट कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 15:19 IST2020-03-14T15:18:45+5:302020-03-14T15:19:11+5:30
देशात पहिल्यांदा उपक्रम : स्वच्छता देखरेख प्रणाली, पहिल्या टप्यात कामाकाजाला सुरुवात

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शासनाच्या प्रत्येक योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी महापालिकेकडून देशात पहिल्यादा प्रत्येक घरांना स्वच्छता देखरेख प्रणाली (आरएफआयडी) स्मार्ट कार्ड बसविण्यात निर्णय घेण्यात आला आहे़ त्यानुसार पहिल्या टप्यात देवपूर भागातील २ हजार ८४४ घरांना डिजीटल चीप बसविण्यात आली आहे़ त्यासाठी सध्या चाळीस कर्मचारी कार्यरत आहे़ दरम्यान दोंडाईचा, शिंदखेडा, शिरपूरनंतर धुळे शहरात पहिल्यांदा राबविणारी देशातील पहिली महापालिका ठरणार आहे़
मालमत्ता होईल स्मार्ट
प्रत्येक घरांना डिजीटल चीप बसविण्यासाठी इंदूर येथील समाधान टेक्नॉलॉजी कंपनीला १ कोटी ७२ लाख ८४ हजार ४० रूपयांचा ठेका देण्यात आला आहे़ त्यानुसार शहरातील ७० ते ८० हजार मालमत्ता धारकांच्या घराबाहेर आरडीएफआय चीफ बसविण्यात येणार आहे़ एका घरासाठी प्रत्येकी २१६ रूपये किंमत मनपाला ठेकेदाराला द्यावी लागणार आहे़ तर देखभार दुरूस्तीसाठी तीन वर्षापर्यत जबाबदारी इंदूर येथील समाधान टेकनॉलॉजीस कंपनीकडे सोपविण्यात आली आहे़ दरम्यान चार महिन्यापासुन कंपनीकडून शहरात सर्व्हेक्षण करण्यात येत होत़
सर्व्हरद्वारे मिळेल माहिती
प्रत्येक प्रभागातील नागरिकांची घरांना बसविण्यात आलेल्या स्मार्ट कार्डचा एकत्रित डाटा संग्रहित करण्यासाठी महापालिकेत मुख्यसर्व्हर बसविण्यात येणार आहे़
घंटागाडीवर देखील वॉच
घरापर्यत घंटागाडी पोहचत नसल्याची तक्रारी सोडविण्यासाठी घराबाहेर ही चीफ बसविण्यात येणार आहे़ त्यामुळे तुमच्या घरासमोरून केव्हा व किती वाजता कोणती घंटागाडी गेली याची माहिती मनपाला मिळणार आहे़ तर प्रभागात येणाऱ्यास घंटागाडी वेळ, मार्ग, ठिकाणाची माहिती मिळण्यासाठी नागरिकांना स्मार्टकार्डवरील बारकोड मोबाईलने स्कॅन केल्यास सविस्तर माहिती मिळू शकते़ तसेच तक्रारी देखील दाखल करता येवू शकते़
देशात पहिली महापालिका
देशात पहिल्यांदा शिरपूर, दोंडाईचा, शिंंदखेडा या तीन शहरानंतर आता धुळे शहरात प्रत्येक घरांना स्मार्ट कार्ड बसविण्यात येत आहे़ या प्रणालीचा वापर करणारी धुळे मनपा देशातील एकमेव ठरणार आहे़
घंटागाडीला जीपीएस प्रणाली
घंटागाडी कुठे आहे याची अद्ययावत माहिती ठेवण्यासाठी प्रत्येक वाहनाला जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम बसविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे़ त्यामुळे आवश्यकता भासल्यास चालकाशी संपर्क साधता येणार आहे़ घंटागाड्यांच्या सायरनमुळे नागरिकांना पूर्व सूचना मिळते. त्यामुळे शहरातून १०० टक्के कचरा संकलन करणे शक्य झाले आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी त्यांना मास्क, हॅण्ड ग्लोज देण्यात आले आहेत.
विनामुल्य स्मार्टकार्ड
नवीन चीप ही विनामुल्य असणार आहे़ यासाठी कोणताही खर्च नागरिकरांकडून घेतला जाणार नाही़ त्यासाठी सध्या ४० कर्मचारी कंपनीकडून नियुक्त करण्यात आले आहे़ त्यांच्याकडून हे कार्ड बसविण्यात येत आहे़ त्यानंतर लवकरच संपुर्ण शहरात हे कार्ड बसविण्यात येईल़