सहा हजार लाभार्थ्यांना मिळाला पहिला हफ्ता, केवळ १७ घरकुले झाली पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:34 IST2021-02-12T04:34:04+5:302021-02-12T04:34:04+5:30
धुळे : जिल्ह्यात ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत पंतप्रधान आवास योजनेची कामे सुरू आहेत. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप करण्यात ...

सहा हजार लाभार्थ्यांना मिळाला पहिला हफ्ता, केवळ १७ घरकुले झाली पूर्ण
धुळे : जिल्ह्यात ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत पंतप्रधान आवास योजनेची कामे सुरू आहेत. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप करण्यात येते. २०२०-२१ या वर्षात १२ हजार ७७ घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ७ हजार ४१९ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. मंजुरी मिळालेल्यांपैकी ६ हजार २१४ लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला आहे, तर २ हजार १०५ लाभार्थ्यांना अद्याप पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा कायम असून, केवळ १७ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. उद्दिष्ट उशिरा प्राप्त झाल्यामुळे घरकुल मंजुरी प्रक्रियेला उशिरा सुरुवात झाली होती. जुलै महिन्यापर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचा विश्वास प्रकल्प संचालक बी. एम. मोहन यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, लाभार्थ्यांना वेळेवर हप्ते अदा केले जातात असे त्यांनी सांगितले.
२०११ साली करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय सर्वेक्षणानुसार प्राधान्यक्रम यादी जाहीर करण्यात आलेली आहे. त्या यादीचे ग्रामसभेसमोर वाचन करून लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्यात येते व अंतिम यादीत नाव असलेल्या लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप करण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांची मदत केंद्र शासनाकडून केली जाते. एकूण चार हप्त्यांमध्ये ही मदत केली जाते. २०२० - २१ या वर्षात मात्र आतापर्यंत केवळ १७ घरांचेच कामे पूर्ण झाली आहेत.
डोक्यावरील छप्पर गेल्याने हाल -
पंतप्रधान आवास योजनेत नाव आल्यामुळे नवीन घर बांधण्यात येणार असल्याने अनेक लाभार्थ्यांनी आपले घर पडले. ते नवीन घराचे काम सुरू करण्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र पहिला हप्ता वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांना बांधकाम सुरू करण्यास विलंब झाला. तसेच दुसरा हप्तादेखील काही लाभार्थ्यांना मिळालेला नाही. कागद पत्रांची पूर्तता करण्यातच अधिक वेळ जात असल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. डोक्यावरील पूर्वीचे छप्पर गेले व नवीन घराला वेळ लागत असल्याने त्यांचे हाल होत आहेत.
प्रतिक्रिया -
मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये उद्दिष्ट प्राप्त झाले होते. जिल्हा परिषद व विधान परिषद निवडणुकीची कामे असल्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीला उशीर झाला. मात्र तरीदेखील ९० टक्के लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. मागील काळात उद्दिष्ट प्राप्तीमध्ये जिल्ह्यात सातत्याने आघाडीवर होता. जुलैअखेर सर्व कामे पूर्ण करण्याचा विश्वास आहे.
- बी. एम. मोहन -
प्रकल्प संचालक
* जिल्ह्यातील पीएम आवास योजनेची आकडेवारी -
किती लोकांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घर मंजूर झाले-७,४१९
किती लोकांना पहिला हप्ता मिळाला-६,२१४
किती लोकांना पुढील हप्ता मिळणे बाकी आहे - १,२०५
तीन वर्षांत मंजूर झालेल्या घरकुलांचे आकडेवारी -
२०१८ - ६,१३४
२०१९ - १४,७७१
२०२० - ७,४१९