दोंडाईचा बसस्थानकात सन्नाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST2021-04-02T04:37:44+5:302021-04-02T04:37:44+5:30
दोंडाईचा येथून नंदुरबार जिल्ह्यात जाण्यासाठी तसेच नंदुरबार जिल्ह्यातून दोंडाईचा येथे येण्यासाठी पुन्हा एस.टी.च्या चाकांना ब्रेक लागल्यामुळे दोंडाईचा येथून प्रवासी ...

दोंडाईचा बसस्थानकात सन्नाटा
दोंडाईचा येथून नंदुरबार जिल्ह्यात जाण्यासाठी तसेच नंदुरबार जिल्ह्यातून दोंडाईचा येथे येण्यासाठी पुन्हा एस.टी.च्या चाकांना ब्रेक लागल्यामुळे दोंडाईचा येथून प्रवासी व काही मजूरवर्ग परत माघारी फिरले. यामुळे अनेकांची हेळसांड होताना दिसून आली, तर लाॅकडाऊनची भीती पसरल्याचे आज पुन्हा प्रवासीवर्गात दिसून आले.
दोंडाईचा आगाराने एस.टी.च्या नंदुरबार, शहादाकडे व त्या जिल्ह्यातील सर्व फेऱ्या बंद असल्याचे सांगितले, तर इतर आगारांतील दोंडाईचावरून या मार्गाकडे मार्गस्थ होणाऱ्या बस दोंडाईचा येथूनच माघारी फिरवल्यामुळे प्रवासीवर्गाची गैरसोय होताना दिसून आली.
ग्रामीण भागातील बऱ्याच फेऱ्यादेखील बंद दिसून आल्या. धुळे, शिरपूर, अमळनेर, नाशिक येथे मात्र १०-१५ प्रवासी जमल्यास बस सोडण्यात येईल, असे दोंडाईचा वाहतूक नियंत्रक वसंत कोळी यांनी सांगितले.
प्रतिक्रिया...
अमळनेर येथून आलो, नवापूर येथे जायचे आहे. दोंडाईचा येथून बस मिळेल, असे वाटले होते. मात्र, बसेस बंद असल्याने परत माघारी जात आहे. एस.टी.ने कोरोनादरम्यान नियम कडक केले पाहिजेत. मास्कशिवाय आत प्रवेश देऊ नये. अनेक प्रवासी विनामास्क प्रवास करतात, यामुळे भीती वाटते. अन्यथा, वाहकांवर कार्यवाही करावी.
मिलिंद शहा,
प्रवासी, अमळनेर