बंद काळात दुकाने सुरु, पोलिसात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 21:26 IST2021-03-30T21:26:02+5:302021-03-30T21:26:19+5:30
शासन आदेशाचे उल्लंघन

बंद काळात दुकाने सुरु, पोलिसात गुन्हा दाखल
धुळे : शासन आदेशाचे उल्लंघन करुन दोन ठिकाणी दुकाने सुरु असल्याचे आढळून आले. परिणामी प्रशासनाने त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवारी रात्री ८ ते मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत निर्बंध लागू केले होते. परिणामी सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही नगावबारी परिसरातील प्रियदर्शनी नगरात विश्राम मोतीराम महाजन (७०) या वृध्दाने किराणा दुकान सुरु ठेवले होते. हा प्रकार सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास निदर्शनास आला. पोलीस कर्मचारी सुनील राठोड यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, भादंवि कलम १८८, २६९, २७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच पोलीस कर्मचारी सागर धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गोंदूर रोडवरील जिल्हा क्रीडा संकुलाजवळ अनिल शांताराम चौधरी (४७) यांनी आपले किराणा दुकान सुरु ठेवल्याचे सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास दिसून आले. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.