म्हसदीत दुकान फोडले, लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 22:50 IST2019-11-03T22:50:32+5:302019-11-03T22:50:53+5:30
घरफोडीचा गुन्हा : श्वान पथकासह ठसे तज्ञांना केले पाचारण

म्हसदीत दुकान फोडले, लाखाचा ऐवज लंपास
म्हसदी : साक्री तालुक्यातील म्हसदी येथील वेदांत सुपर बाजार किराणा दुकान फोडून चोरट्याने रोकडसह अन्य ऐवज असा एकूण १ लाख १० हजारांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली़ दरम्यान, चोरटा हा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेला आहे़
साक्री तालुक्यातील म्हसदी येथील बसस्टॉप भागात विनोद जैन यांचे वेदांत सुपर बाजार नावाचे दुकान आहे़ रविवार पहाटे २ ते ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेरा वरती करून कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला़ दुकानांमध्ये शिरल्यानंतर चोरांच्या हाती चांदीची मूर्ती व सोन्याची मूर्तीसह गल्यातले दहा हजार रुपये आणि किराणाच्या काही वस्तू असे इतर काही ऐवज असा एकूण एक लाख दहा हजारांपर्यंतचा ऐवज चोरट्याने चोरुन नेला़ सकाळी घटना उजेडात आली़ लागलीच घटनेची माहिती साक्री पोलिसांना कळविण्यात आली़ गांभिर्य ओळखून धुळ्याहून श्वान पथकासह ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले़
त्यांनी प्राथमिक तपास करुन चोरट्यांचा माग काढण्यात प्रयत्न केला़ याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल कैलास पाटील करीत आहेत़ चोरीची चर्चा गावात सुरु आहे़