शिरपूर तालुका पोलिसांकडून ११ महिन्यापुर्वीचा गुन्हा उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:08 IST2020-03-03T12:07:37+5:302020-03-03T12:08:17+5:30
५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत : दोन जणांना अटक, चौकशी सुरु

शिरपूर तालुका पोलिसांकडून ११ महिन्यापुर्वीचा गुन्हा उघड
धुळे : ११ महिन्यांपुर्वी टायर व ट्यूब चोरीचा गुन्हा शिरपूर तालुका पोलिसांनी उघड केला आहे़ याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ५० लाख ७१ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे़
राजस्थान राज्यातील भिवाडी येथील एका कंपनीतून जेसीबी व हारवेस्टर मशीन करीता उपयोगात येणारे टायर्स व ट्यूबने भरलेला एचआर ३८ आर ०५५५ क्रमांकाचा ट्रक पुणे येथे माल देण्याकरीता निघाला होता़ ८ मे २०१९ रोजी रात्री हा ट्रक शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथील तपासणी नाक्यावर आला़ ट्रक चालकाकडे एकाने लिफ्ट मागितली़ त्या अनोळखीने चालकाला थंडपेयमधून गुंगीचे औषध दिले़ त्यानंतर या ट्रकमधून १७१ नग रबरी टायर करीता ट्यूब असा सुमारे ५० लाख ७१ हजाराचा ऐवज लंपास केला होता़ याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला होता़
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी त्यांच्या पथकातील लक्ष्मण गवळी, संजय देवरे, संजीव जाधव, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, योगेश मोरे, शाम पावरा यांनी तपासणी, चौकशी आणि सापळा लावला आणि रविराज युवराज फुलमाळी (२९, रा़ कडोदरा, ता़ पलासना जि़ सुरत) आणि प्रविण आधार शिंपी (२८, रा़ माऊलीनगर, वरखेडी रोड, धुळे) या दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे़ त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला जात आहे़