शिरपूर : जिल्हास्तरीय कन्या कौशल्य शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 22:48 IST2019-05-10T22:47:29+5:302019-05-10T22:48:12+5:30
गायत्री परिवारातर्फे ५ दिवशीय निवासी शिबीराचा समारोप

dhule
शिरपूर : भारतीय संस्कृतीतील संस्कार नव्या पिढीला कळावेत व त्यांची जपणुक व्हावी, मुलींच्या आंतरीक शक्तीचे जागरण करणे व रचनात्मक कार्यामध्ये पारंगत करणे या उद्देशाने येथील गायत्री मंदिर परीवाराने जिल्हास्तरीय कन्या कौशल्य शिबीर घेतले़
उंटावद येथील सुलाईमाता मंदिराच्या हॉलमध्ये ५ दिवशीय निवासी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात संस्कार देण्याचे काम स्रीच चांगल्या पध्दतीने करु शकते म्हणून स्री शक्ती जागृत करुन त्यांना याचे महत्व कळावे व बालपणापासूनच त्यांच्यावर संस्कार रुजवावेत म्हणून हे शिबीर मुलींसाठी घेण्यात आले़
धुळे व नंदुरबार जिल्हयातील सुमारे २०० मुलींनी यात सहभाग घेतला. प्रत्येक मुलीला परीवाराकडुन पिवळा गणवेश देण्यात आला होता. सकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत जागरण, ध्यान, प्रवचन, प्रशिक्षण, डफली गीत, संस्कार शिक्षण, श्रमदान, प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम असा या शिबीराचा दिनक्रम होता.
शिबिरार्थी मुलींनी अनुभव कथन केले. शिबीरात येण्यापूर्वी व शिबीरानंतर आपल्यात आमुलाग्र बदल झाल्याची भावना व्यक्त केली. जप, संस्कार, जन्मदिन संस्कार, विद्यार्थी संस्कार यातून देण्यात आले. घरच्यांशी, मोठ्यांशी कसे वागावे, आदर कसा ठेवायचा याचे संस्कार करण्यात आले. गायत्री मंत्राच्या उच्चारांनी कंपन मिळाल्यामुळे मानसिकतेत बदल झाला. सकारात्मकता आली. विचार प्रगल्भ झाले. कर्तव्याची जाणीव ठेवणे, वेळेचे नियोजन करणे, शिस्तीने वागणे, स्वयंपुर्ण होणे, स्वावलंबी बनणे, समजदारी, जबाबदारी, बहादुरी यांची जाणीव होणे, अॅडजेस्टमेंट करायला शिकणे, अध्यात्म व सायन्स यांच्यातून सुवर्ण मध्य साधणे, आत्मसन्मान जागवणे, मैत्री कुणाशी करणे, परिसर स्वच्छ कसा ठेवणे, संयम राखणे, समजून घेणे या सर्व भारतीय संस्कृतीचे संस्कार आत्मसात केल्याचे त्यांनी नमुद केले. व्यासपीठावर बोलण्याचे धाडस, मैत्रीपुर्ण संबंध याचेही ज्ञान मिळाल्याचे या मुलींनी सांगितले.
गायत्री परिवाराचे प्रमुख कमलकिशोर भंडारी, अनील अग्रवाल, शिवाजीराव पाटील, के़एम़ राजपूत व गायत्री परीवाराच्या पदाधिकाºयांनी शिबिराचे आयोजन केले होते.