३० खाजगी डॉक्टर देणार सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 12:31 IST2020-07-27T12:31:43+5:302020-07-27T12:31:54+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव : दोंडाईच्यात आय.एम.आय. व आयुष संघटना सज्ज

३० खाजगी डॉक्टर देणार सेवा
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे संख्याबळ कमी पडत आहे. या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका, महसूल व पोलिस प्रशासनाच्या आवाहनानुसार दोंडाईचा शहरातील किमान ३० खाजगी डॉक्टर उपजिल्हा रुग्णालयात सेवा देणार आहेत.
दोंडाईचा व परिसरात कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढत आहे. दोंडाईच्यात ५० दिवसात कोरोना बाधितांची संख्या ९१ झाली आहे. अजून सुमारे १०० जणांचे स्वॅब अहवाल येणे बाकी असल्याने रुग्ण संख्या वाढणार आहे. बहुतांश नागरिक अजूनही मास्क वापरत नाहीत, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत नाहीत, नियमांचे काटेकोर पालन करीत नाहीत, यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.
उपजिल्हा रुग्णालयात फक्त ५ वैद्यकीय अधिकारी आहेत. परिचारिका, वार्डबॉय कमी आहेत. जेमतेम दोन सफाई कामगार आहेत. ५ डॉक्टरांना स्वॅब घेणे, उपचार करणे, रुग्ण आढळल्यावर ट्रेसिंग करणे, आॅक्सिजन सिलेंडर लावणे, रिपोर्ट करणे आदी कामे करावी लागतात. त्यातच कोरोना रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. कोरोना रुग्ण व अन्य रुग्ण यांना सेवा देण्यास ५ डॉक्टरांची संख्या कमी पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज दोंडाईचा नगरपालिकेत अपर तहसीलदार सुदाम महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल नरोटे, पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांनी दोंडाईच्यातील खाजगी वैद्यकीय सेवा देणाºया डॉक्टरांची बैठक आयोजित केली होती.
दोंडाईचातील खाजगी वैद्यकीय सेवा देणाºया डॉक्टरांनी उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधितांची रुग्ण संख्या वाढत असल्याने सेवा द्यावी, असे आवाहन अपर तहसीलदार सुदाम महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ.हितेंद्र देशमुख, डॉ.प्रफुल्ल दुग्गड यांनी केले.
बैठकीला तहसीलदार सुदाम महाजन, नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी हर्षल भामरे, बांधकाम अभियंता जगदीश पाटील, शिवनंदन राजपूत, पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, शिंदखेडा कोविड सेंटरचे डॉ.हितेंद्र देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल नरोटे, डॉ.सचिन पारख, डॉ.प्रफुल्ल दुग्गड, प्रशासनाच्यावतीने उपस्थित होते. तर खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये आय.एम.आय.चे अध्यक्ष डॉ.हेमंत नागरे, आयुष संघटनेचे अध्यक्ष डॉ.जितीन अग्रवाल, डॉ.अनिल धनगर, डॉ.सुधीर साठे, डॉ.चेतन बच्छाव, डॉ.जयेश ठाकूर, डॉ.विशाल भामरे, डॉ.संदीप भावसार, डॉ.कुणाल थोरात, डॉ.दीपक परमार, डॉ.भूषण चौधरी, डॉ.भूषण वाडीले आदी उपस्थित होते.
कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दोंडाईच्यातील आय.एम.आय. व आयुष संघटनेचा सर्व डॉक्टरांनी उपजिल्हा रुग्णालयात सेवा देण्यास होकार दिला आहे. खाजगी डॉक्टर उपजिल्हा रुग्णालयात ओपीडी व कोरोना सेंटरला दररोज मदत करणार आहेत. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयास मोठा हातभार लागणार आहे.