Second encroachment removed | दुसऱ्यांदा अतिक्रमण हटविले

दुसऱ्यांदा अतिक्रमण हटविले

धुळे : देवपुरातील नकाणे रोडवरील स्टेट बँक कॉलनी भागात रस्त्यावर उभ्या राहणाºया भाजीपाला, फळ विक्रेत्यांना महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या पथकाने हटविले, जेसीबीची मदत घेऊन त्यांनी केलेले अतिक्रमणही काढत पुन्हा न करण्याचा दमही भरला़ दरम्यान, याच भागात दुसऱ्यांदा ही मोहीम राबविण्यात आलेली आहे़
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाच्यावतीने ठिकठिकाणी कारवाई करण्यात येत आहे़ दोन दिवसांपुर्वीच शहरातील वडजाई रोड परिसरात अतिक्रमण निर्मुुलन पथकाने काही व्यावसायिक आणि काही निवासी अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला़ यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ कोणाचाही मुलाईजा न बाळगता अतिक्रमण काढण्यात आले़ तणावपुर्ण वातावरण असलेतरी सध्या या भागात शांतता आहे़
देवपुरातील नकाणे रोडवरील स्टेट बँक कॉलनी परिसरात विनोद मोराणकर यांच्या घरालगत वर्दळीच्या रस्त्यावर भाजी आणि फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण करुन रस्ता मोठ्या प्रमाणावर अडविला होता़ गेल्या १५ दिवसांपुर्वीच अचानक याच भागात अतिक्रमण निर्मुलन विभागाने आपली नजर वळवून रस्त्यावरील अतिक्रमण काढून पुन्हा न करण्याची तंबी दिली होती़ मात्र या विभागाची पाठ फिरताच पुन्हा त्याच ठिकाणी भाजी व फळ विक्रेत्यांनी आपले बस्तान बिनधास्तपणे मांडले़ परिणामी रस्ता निमुळता होत गेला होता़ ही बाब पथकाने हेरली आणि अचानक गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जेसीबी मशिन आणून अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केला़ तसेच पुन्हा अतिक्रमण न करण्याचा दमही भरला़ पथकाला पाहताच अनेकांनी आपल्या लोटगाड्या तिथून हलविणे पसंत केले़ यावेळी एकच धावपळ उडाली होती़
मालेगाव रोडवरही कारवाई
शहरातील मालेगाव रोडवर रेल्वे क्रॉसिंगच्या पुढील भागात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाने आपला मोर्चा वळविला़ याठिकाणी विनापरवानगी उभारण्यात आलेली कमान जेसीबीच्यावतीने तोडण्यात आली़ शिवाय याच परिसरात होत असलेले अतिक्रमण देखील काढण्यात आले़ कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़

Web Title: Second encroachment removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.