विज्ञानामुळे मानवी जीवन सुकर झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:34 IST2021-05-15T04:34:35+5:302021-05-15T04:34:35+5:30
साक्री : प्रयोगशीलता आणि अखंड मेहनतीच्या जोरावर मानवाला हवे ते शोधणे शक्य होते आहे. विज्ञान तर ज्ञानाचा ...

विज्ञानामुळे मानवी जीवन सुकर झाले
साक्री : प्रयोगशीलता आणि अखंड मेहनतीच्या जोरावर मानवाला हवे ते शोधणे शक्य होते आहे. विज्ञान तर ज्ञानाचा अखंड झरा असल्यामुळे मानवी जीवन सुकर बनवण्यासाठी त्याचा वेळोवेळी वापर म्हणजे वैज्ञानिक क्रांती असल्याचे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील यांनी केले.
साक्री येथील सी. गो. पाटील महाविद्यालयात विज्ञान मंडळाच्या ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी ‘ऊर्जा विनयेन शोभते’ या विषयावर ते प्रमुख व्याख्याते व उद्घाटक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. अनंत पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉ. सचिन नांद्रे, आदी उपस्थित होते.
ऊर्जा व त्याचे महत्त्व स्पष्ट करताना प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा, त्याचबरोबर विद्यार्थी विज्ञानाधिष्ठित व्हावा यासाठी प्रयत्नरत राहणे गरजेचे आहे. ऊर्जा व त्याचे मानवी जीवनातील महत्त्व, त्याचबरोबर ऊर्जेची निर्मिती इत्यादींविषयी त्यांनी माहिती दिली. विज्ञानामुळे जगात बदल झाल्याचेही त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांनी ऊर्जा विषयीची साक्षरता सर्वश्रुत होऊन ऊर्जेचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून, या कार्यक्रमातून या अभिनव उपक्रमाला चालना देणे स्तुत्य असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्रा. एस. डी. पालखे यांनी केले तर प्रा. विलास पावरा यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण व विज्ञान मंडळ समितीचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला विज्ञान विषयाचे अभ्यासक, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.