जिल्ह्यात शाळा सुरू, मात्र एसटीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:46 IST2021-02-05T08:46:47+5:302021-02-05T08:46:47+5:30
ग्रामीण भागातून शहरात शाळा, महाविद्यालयात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसची सोय आहे. तर विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र मानव विकासच्या बसेस ...

जिल्ह्यात शाळा सुरू, मात्र एसटीची प्रतीक्षा
ग्रामीण भागातून शहरात शाळा, महाविद्यालयात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसची सोय आहे. तर विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र मानव विकासच्या बसेस आहेत. जिल्ह्यात प्रत्येक आगाराला सात मानव विकासच्या बसेस देण्यात आलेल्या आहेत. या बसमधून ९ वी ते १२वीपर्यंत विद्यार्थिनींना मोफत प्रवास करता येतो. विद्यार्थिनींची यादी ही शाळेकडूनच प्राप्त होत असते. त्यानंतरच विद्यार्थिनींना प्रवासाची मुभा मिळत असते. मानव मिशनचे मार्ग मंजूर करण्यात आलेले आहे. त्याच मार्गावर निळ्या रंगाच्या बसेस धावत असतात. या मार्गावर जेवढी गावे असतील तेथील विद्यार्थिनींनाही या बससेवेचा लाभ घेता येतो.
दरम्यान धुळे तालुक्यात सातपैकी पाच मानव मिशनच्या बसगाड्या सुरू झालेल्या आहेत. त्यात बोरीस, नगाव, पिपंरखेड देऊर, बोरविहीर, शिरुड या गावांचा समावेश आहे. तर येत्या एक -दोन दिवसात पिंपरखेड, नंदाळे या मार्गावरही या बसेस सुरू करण्यात येणार आहे. शिंदखेडा, शिरपूर, साक्री या तालुक्यांमध्ये ज्या मार्गावर मानव विकासच्या बसेसला मंजुरी मिळालेली आहे, त्या मार्गावर बस सुरू झालेल्या आहेत. कोरोनापूर्वी जेवढ्या बसगाड्या होत्या, तेवढ्याच आताही सुरू झालेल्या आहेत. मात्र काही भागात लालपरीची अडचण असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
बहुतांश मार्गावरील बससेवा झाली पूर्ववत सुरू
कोरोनामुळे एसटी महामंडळाचे चक्काजाम होते. अनलाॅकनंतर १९ ॲागस्ट २०२०पासून आंतरजिल्हा बससेवा सुरू झालेली आहे. सुरुवातीला बसमध्ये एका सीटवर एकच प्रवासी बसण्यास मुभा होती. आता मात्र बसेस भरून जात आहेत. आता पाचवी ते १२वीपर्यंतच्या शाळा, महाविद्यालये सुरू झालेली आहेत. मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती अजुनही अल्पप्रमाणात आहे. जिल्ह्यातील बहुतांश मार्गावर बसेस सुरू आहेत. एकाही मार्गावर बस नाही, अशी गावे नाहीत.
कोरोनाआधी मानव विकासच्या २८ बसेस धावत होत्या.
ग्रामीण भागातून शहरात शिकायला येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र बससेवा असावी यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून मानव विकासच्या बससे सुरू करण्यात आल्या. या बसमधून नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत प्रवास करता येत असतो. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्यावेळी या बसेस सोडण्यात येतात. धुळे जिल्ह्यात कोरोनाच्या पूर्वी प्रत्येक आगारामार्फत सात याप्रमाणे २८ मानव विकासच्या बसेस सोडण्यात येत होत्या. कोरोनानंतर आतापर्यंत २६ बसेस सुरू करण्यात आलेल्या असून, उर्वरित दाेन बसेस लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.
विद्यार्थी म्हणतात...
शाळा सुरू झाल्याचा आनंद झालेला आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरातच दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने, आम्ही साक्री शहरात शिकण्यासाठी येत असतो. मात्र या आगारातून सोडण्यात येणाऱ्या बसगाड्या अनियमित सोडण्यात येतात. अनेकदा बसेस वेळेवर येत नसल्याने, शाळेला दांडी मारावी लागते. अगोदरच शाळा उशिरा सुरू झालेल्या आहेत.
- भावेश पाटील,
इयत्ता आठवी
कनिष्ठ महाविद्यालये सुरू होऊन आता दीड महिन्याचा कालावधी झालेला आहे. मात्र अजूनही काही गावात मानव मिशनच्या बसेस येत नाहीत. त्यामुळे जी बस सुरू आहे, त्यानेच प्रवास करावा लागतो. ग्रामीण भागात ठराविक गावांनाच मानव विकासच्या बसेस सुरू असून, त्याची संख्या कमी आहे. महामंडळाने या बससेची संख्या वाढविल्यास विद्यार्थीनिंना फायदा होईल. - सरला देशमुख,
इयत्ता अकरावी, नवलनगर.
धुळे आगाराला मानव मिशनच्या एकूण सात बसेस आहेत. आतापर्यंत बोरविहीर, म्हसदी, नगाव या मार्गावर बसेस सुरू झालेल्या आहेत. जसजसे पासेसची प्रक्रिया सुरू तसे उर्वरित मार्गावरही या बसेस सुरू होतील.
- अनुजा दुसाने,
धुळे आगार प्रमुख,धुळे