सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:33 IST2021-01-13T05:33:38+5:302021-01-13T05:33:38+5:30

नेर : येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी माजी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतचे माजी सदस्य आणि काही पक्षांचे ...

Sarpanch, Zilla Parishad Member, Panchayat Samiti | सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे

सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे

नेर : येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी माजी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतचे माजी सदस्य आणि काही पक्षांचे पदाधिकारी आपले नशीब अजमावत आहेत. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे.

येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १ मध्ये लक्षवेधी लढत होत आहे. यात ना म प्र मध्ये माजी जि. प. सदस्या तथा महिला जिल्हा काँग्रेस अध्यक्षा गायत्री संजय जयस्वाल यांच्या विरोधात माजी ग्रामपंचायत सदस्य देवीदास धनराज माळी यांच्यात लढत होत आहे. या दोघांना दोन अपक्षांचाही सामना करावा लागणार आहे. याच वॉर्डात अनु. जमातीमध्ये माजी पंचायत समितीच्या सदस्या जबनाबाई देवा सोनवणे ह्याही आपले नशीब अजमावत असून, एसटी प्रवर्गाचे आरक्षण निघाल्यास त्याच सरपंच पदासाठी प्रबळ दावेदार आहेत. त्यांच्या विरोधात असलेल्या जिजाबाई महादू मालचे यांच्याशी त्यांची समोरासमोर लढत आहे. तसेच याच वॉर्डात अनु. जमातीमध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य मांगू चैत्राम मोरे यांच्या समोर पुतण्या दीपक काशिनाथ मोरे याच्याशी जोरदार लढत होणार आहे.

वॉर्ड क्रमांक ४ मध्ये पंचायत समितीच्या सदस्या सोनू सुमित जयस्वाल यांचे पती सुमित संजय जयस्वाल निवडणूक रिंगणात असून त्यांना रिक्षाचालक संजय पाटील यांनी आव्हान दिले आहे. तसेच याच वॉर्डात सर्वसाधारण जागेवर मनीषा देवेंद्र जैन यांची लढत कल्पना विजय जगदाळे यांच्याशी होणार आहे. यामुळे यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे. तसेच प्रचारास अवघे दोनच दिवस उरले असल्याने सर्वच वॉर्डांत प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. होम टू होम प्रचार, कॉर्नर सभाही चांगल्याच रंगू लागल्या आहेत. तसेच भाऊबंदकी आणि नातीगोती गोळा केली जात आहेत. प्रत्येक जण आपला विजयाचा दावा करीत आहे. त्यामुळे अटीतटीची लढत होत असून तालुका तसेच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचेही लक्ष लागून आहे.

पाणी, स्वच्छता, पथदिवे प्रचारातील मुद्दे

ग्रामस्थांना ग्रामपंचायतीकडून अपेक्षित असलेल्या पाणी, स्वच्छता, पथदिवे या मूलभूत सुविधा नियमित पुरविण्यासंदर्भात उमेदवारांकडून आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे हेच प्रचारातील कळीचे मुद्दे ठरत असून वॉर्ड विकासाचे एक नवीन मॉडेल उभारण्याचेही काही उमेदवार मतदारांना सांगत आहेत. त्यामुळे मतदानानंतर सर्वांनाच कोण विजयी होईल, याची उत्सुकता लागून आहे.

Web Title: Sarpanch, Zilla Parishad Member, Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.