ग्रामपंचायतीचा दंड भरण्यासाठी सरपंच महिलेने विकले आपले दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:25 IST2021-06-03T04:25:50+5:302021-06-03T04:25:50+5:30
अनेक वर्षांपासून दभाशी गावात पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी गेल्या वर्षी सरपंच ...

ग्रामपंचायतीचा दंड भरण्यासाठी सरपंच महिलेने विकले आपले दागिने
अनेक वर्षांपासून दभाशी गावात पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी गेल्या वर्षी सरपंच नंदिनी विकास पाटील यांनी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्याकडे पाठपुरावा करून नियमित पाणीपुरवठा करवून घेतला होता. त्यामुळे आठ दिवसांनी येणारे पाणी आता दररोज येऊ लागले होते. तसेच ग्रामस्थांसाठी गावात आर.ओ. पाणी फिल्टर बसविण्यात आले होते. या फिल्टरची चाचणी करण्यासाठी आकडा टाकण्यात आला होता. याबाबत विरोधकांनी नाशिक व जळगाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत् महामंडळाचे अधिकाऱ्यांकडे कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावरून २८ मे रोजी नरडाणे येथील पथकाने पाणी फिल्टर व इतर तीन मोटरींचे पाण्याचे कनेक्शन कट करून दभाशी ग्रामपंचायतीवर कार्यवाही करून ८४ हजार ८० रुपयांचा दंड ठोठावला. या संकटाला तोंड देण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व गावातील वरिष्ठ ग्रामस्थांना बोलविण्यात आले. चर्चेतून घरपट्टी व पाणीपट्टी गोळा करून दंड भरण्यात निर्णयदेखील झाला. मात्र, कोरोनामुळे वसुलीस अडचणी आल्या. दंडाची रक्कम न जमत असल्याने सरपंच नंदिनी पाटील यांनी सोन्याचे दागिने विकून ८४ हजार ८० रुपयांचा दंड भरला. सरपंचांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होत आहे.
कोट -
ग्रामपंचायतीवर ऐनवेळेस संकट आल्याने सरपंच नंदिनी पाटील यांनी आपले सोने मोडून ग्रामपंचायतीचा दंड भरला हा निर्णय खरोखर कौतुकापात्र आहे.
-गोकुळ झालसे
विरोधकांनी केवळ राजकारणापोटी तक्रार करून गावाला व ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, गावाची व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने साेडविता यावा, यासाठी मी माझे दागिने मोडून महावितरण कंपनीचा दंड भरला आहे.
- नंदिनी विकास पाटील
सरपंच ग्रामपंचायत दभाशी