शिरपूर : शिरपूर तालुक्यातील भोईटी ते सुळे रोडवरून जाणाऱ्या एका कारमधून १ लाख ६३ हजार रुपये किमतीचा गांजा सांगवी पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी दुपारी पकडला. याप्रकरणी सायंकाळी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गांजा, कार, मोबाइलसह ८ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.शिरपूर तालुक्यातील भोईटी ते सुळे रोडावरून एका कारमधून गांजा वाहून नेला जाणार असल्याची गोपनीय माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी मिळाली. माहिती मिळताच सुळे गावातील नदीच्यापुढे ५०० मीटर अंतरावर कार (एमपी १३ सीसी ८५७३) येताच ती अडविण्यात आली. कारमध्ये काय आहे, याची विचारणा चालकाकडे केली असता उडवा-उडवीची उत्तरे मिळाली. कार बाजूला घेऊन तपासणी केली असता पांढऱ्या गोणीमध्ये पान, बिया, काड्यांचा चुरा असलेला गांजा सापडला. जागेवरच त्याचे वजन केले असता १६ किलो १०० ग्रॅम त्याचे वजन आढळून आले असून त्याची किंमत १ लाख ६३ हजार इतकी आहे. कारची किंमत सात लाख असून, सात हजार रुपयांचा मोबाइल असा एकूण ८ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना ३१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.याप्रकरणी पोलीस कर्मचारी संजीव जाधव यांनी सांगवी पोलीस ठाण्यात दि. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार, रविकुमार बाबुलाल सोनपरख (४२, रा. उज्जैन) आणि नितेश किशोर ठाकूर (३०, रा. इंदूर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे घटनेचा तपास करीत आहेत.
कारमधून नेला जाणारा गांजा सांगवी पोलिसांनी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 21:55 IST