धुळे : शहरातील गरीब रुग्णांच्या उपचारासाठी एकमेव सरकारी मोठे रुग्णालय असलेल्या हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील घाणीचे समाजवादी पार्टीने वाभाडे काढले आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घाणीचे छायाचित्र झळकवून निदर्शने केली. त्वरित स्वच्छता न केल्यास अधिकाऱ्यांच्या दालनात कचरा फेकण्याचा इशाराही दिला आहे. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरासह जिल्ह्यात साथीच्या आजारांचा फैलाव झाला असून, आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. काही रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. परंतु गरीब रुग्ण हिरे रुग्णालयात जावून उपचार घेतात. साथीचे आजार पसरल्याने स्वच्छतेचे आवाहन आरोग्य विभाग सातत्याने करीत आहे. परंतु खुद्द सरकारी रुग्णालयातच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे रुग्ण अधिकच आजारी पडण्याची शक्यता आहे. तसेच सोनोग्राफीसाठी डाॅक्टर नसल्याने ओपीडी बंद पडली आहे. खासगी दवाखान्यात सोनोग्राफीला हजार ते पंधराशे रुपये माेजावे लागतात. सिटीस्कॅन मशिनही कधी सुरु असते तर कधी बंद असते. अशा अनेक समस्या रुग्णांना हैराण करीत आहेत. त्यामुळे रुग्णालयात कचरा संकलन व स्वच्छतेचे टेंडर काढावे, वर्ग ४ च्या नवीन कर्मचाऱ्यांची भरती करावी आदी मागण्या केल्या आहेत. रुग्णालयात त्वरित स्वच्छता झाली नाही तर अधिकाऱ्यांच्या दालनात कचरा फेको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या वेळी समाजवादी पार्टीचे नगरसेवक अमीन पटेल, आसिफ मन्सुरी, अकील अन्सारी, इनाम सिद्दीकी, रफीक शाह, जाकिर खान, रशीद शाह, गुड्डू काकर, गुलाम कुरेशी, सल्लु, इसलाम अन्सारी, ताैसीफ खाटिक, अजीज अंन्सारी, इमरान शेख, रईस अन्सारी, आमिन शाह, हसन बडे, साजिद मक्कु, शकील हवाईजहाज, रमजान पहेलवान, सलीम टेलर, अकील शाह, मुनवर अन्सारी,सादीक अन्सारी, अप्पू अन्सारी, रफीक आदी उपस्थित होते.