नवागाव येथील मातीचा बंधारा फुटल्याने रोहिणी नदीला अचानक आला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:42 IST2021-09-24T04:42:15+5:302021-09-24T04:42:15+5:30

रोहिणी नदीला अचानक पूर वाढला निजामपूर - साक्री तालुक्यात माळमाथ्यावर गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास सालटेक परिसरात मुसळधार पाऊस पडला. ...

The Rohini river suddenly flooded due to the eruption of the earthen dam at Navagaon | नवागाव येथील मातीचा बंधारा फुटल्याने रोहिणी नदीला अचानक आला पूर

नवागाव येथील मातीचा बंधारा फुटल्याने रोहिणी नदीला अचानक आला पूर

रोहिणी नदीला अचानक पूर वाढला

निजामपूर - साक्री तालुक्यात माळमाथ्यावर गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास सालटेक परिसरात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे नाल्याला पूर आला. पुरामुळे नाल्यावर नवागाव जयभीम सोसायटी येथे बांधण्यात आलेला मातीचा बंधारा फुुटला. बंधाऱ्यातील पाणी रोहिणी नदीला जाऊन मिळाले. परिणामी रोहिणी नदीला अचानक मोठा पूर आला. या पुरामुळे नाल्याकाठावर असलेल्या शेतांमध्ये पाणी शिरले असून त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान रोहिणी नदीच्या उगमाकडे म्हणजे खुडाणे येथे चांगला पाऊस पडला. त्यामुळे रोहिणी नदीस पूर आला. शिवाय नवागाव सालटेक येथे जोरदार पाऊस पडला. ते पाणी नवागाव जयभीम सोसायटीच्या या मातीच्या बंधाऱ्यात आले. त्यामुळे हा मातीचा बंधारा फुटला. त्या पाण्याचा विसर्ग पण रोहिणी नदीत आल्याने मोठा पूर आला. रोहिणी नदी ही निजामपूर आणि जैताणे गावांना वळसा देत वाहते. नदीस अचानक पूर आला, त्यामुळे दोन्ही गावांतील नदीकाठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, बंधारा फुटला त्या ठिकाणी निजामपूरचे तलाठी भूषण रोझेकर यांनी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. नाल्याकाठावरील शेतांमध्ये पाणी गेल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता तलाठी रोझेकर यांनी व्यक्त केली आहे. नुकसानीचा अंदाज उद्या पुराचे पाणी ओसरल्यानंतरच येईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: The Rohini river suddenly flooded due to the eruption of the earthen dam at Navagaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.