बोराडीत एकाच रात्री चार ठिकाणी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 21:40 IST2019-12-31T21:40:00+5:302019-12-31T21:40:32+5:30

हजारोंचा ऐवज लंपास : गावात एकच चर्चा

Robbery at four places in one night | बोराडीत एकाच रात्री चार ठिकाणी चोरी

बोराडीत एकाच रात्री चार ठिकाणी चोरी

शिरपूर : तालुक्यातील बोराडी येथे एकाच रात्री बंद असलेली तीन घरे आणि एक किराणा दुकान चोरट्यांनी फोडले़ यात हजारो रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला आहे़ तसेच विशेष म्हणजे हे चारही घरातील लोक बाहेर गावी गेलेले होते. ही संधी चोरट्याने साधली़ या घटनेमुळे बोराडी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बोराडी येथील बडगुजर गल्लीतील संजय किराणा दुकान, शिवाजी नगरातील संजय सूर्यभान पवार, कर्मवीर नगरमधील अजय गंगाराम बडगुजर व देवमोगरा कॉलनीतील शिलाबाई पाटील हे चारही घर मालक बाहेरगावी गेल्याची संधी चोरट्याने साधली़ चोरट्यांनी पहाटे एक ते दोन वाजेच्या सुमारास घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला़
किराणा दुकानदार घरी नसल्यामुळे किती पैसे गेले हे अजून समजले नाही. तर शिलाबाई पाटील यांच्या घरातील कपाटातून पंधरा हजार रुपये तसेच अजय बडगुजर यांच्या घरातील कपाटातून एक पाच ग्रम सोन्याची अंगठी व पाच हजार रुपये रोख तर संजय पवार यांच्या घरातून एक तोळे सोने व तीन हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्याने लांबविला आहे़ ही घटना मंगळवारी सकाळी उजेडात आली़
बोराडी गावात चोरी झाल्याची माहिती मिळताच सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे, बीट हवालदार पी. पी. मोरे, संजय जाधव, संजय देवरे, भुषण चौधरी, सुरेश ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामे केले आहेत. त्यानुसार चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. दरम्यान, बोराडी गावात या एकच विषयावर ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरु असल्याचे दिसत आहे़

Web Title: Robbery at four places in one night