समाजवादी पार्टीच्या प्रदेश सचिवाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 21:36 IST2020-08-07T21:36:07+5:302020-08-07T21:36:28+5:30
सोनगीरजवळील घटना : दोघांचा प्रताप

समाजवादी पार्टीच्या प्रदेश सचिवाला लुटले
धुळे : नंदुरबारहून धुळ्याच्या दिशेने मोटारसायकलीने येणारे समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव यांना सोनगीर जवळील सोंडले गावाजवळ दोघांनी लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली़ यात त्यांचा मोबाईल आणि जवळ असलेले १०० रुपये लुटून दोघा भामट्यांनी पलायन केले़
समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव कुतबुद्दीन शेख उर्फ गुड्डू काकर (रा़ अन्सार नगर, धुळे) हे नंदुरबार येथे कामानिमित्त गेले होते़ आपले दैनंदिन काम आटोपून ते आपल्या दुचाकीने धुळ्याच्या दिशेने निघाले़ दोंडाईचा ते सोनगीर दरम्यान साधारण ५ किमी अंतरावर असलेल्या सोंडले गावाजवळ त्यांची दुचाकीला दोन जणांनी त्यांच्या दुचाकीने कट मारला़ अंधारामुळे काकर यांच्या लक्षात आले नाही़ यात ते खाली पडले़ अशातच त्यांना या दोघा भामट्यांनी पकडले़ त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडे असलेले शंभर रुपये आणि मोबाईल लुटून पोबारा केला़ स्वत:ला कसेबसे सावरत काकर यांनी सोनगीर पोलीस ठाणे गाठले़ घडलेली आपबीती पोलिसांना कथन केल्यानंतर फिर्याद दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते़
दरम्सान, रात्रीच्यावेळेस दुचाकीने येणाऱ्यांना अडविणे आणि त्यांची लूट करण्याच्या घटना सध्या मोठ्या प्रमाणावर घडत आहेत़