धुळे : भारत सरकारने १०९ रेल्वे मार्गावर १५१ रेल्वे गाड्या खासगी तत्वावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यासाठी देशी-विदेशी खासगी कंपन्यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे़ मात्र सरकारच्या या खासगीकरणाच्या निर्णयाचा तीव्र विरोध भारतीय ट्रेड युनियन आणि डाव्या पक्षांनी केला आहे़ धुळ्यात आज ट्रेड युनियनच्या धुळे जिल्हा शाखेच्यावतीने धुळे रेल्वे स्थानकात निदर्शने करीत स्टेशन प्रबंधक संतोष जाधव यांना निवेदन देण्यात आले़खासगी रेल्वे गाड्या चालवण्याच्या निर्णयामुळे ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, जलद गतीने प्रवास होईल आणि प्रवासी भाडे कमी होईल असे सरकारचे म्हणणे आहे़ परंतु आत्तापर्यंत अनुभव लक्षात घेतला तर खासगी क्षेत्र स्वत: काहीच गुंतवणूक करीत नाही़ आपल्या देशातल्या विविध बँकांमधून मोठी कर्ज घेतली जातात़ त्यातून सरकारी मालमत्ता कवडीमोल किंमतीत विकली जाते़ त्यानंतर काही दिवस हे उद्योग चालवितात़ त्यानंतर हे उद्योग बंद पडतात़ किंवा एनपीए होतात़ अडचणीत आणि तोट्यात येतात़ कर्जपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक बँका यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला किंवा रोजगार निर्मितीसाठी फारसा फायदा झालेला नाही़ असेही निवेदनात म्हटले आहे़तसेच यापुर्वी ज्या तीन रेल्वे गाड्या खासगी कंपन्यांना चालविण्यास देण्यात आलेल्या आहेत त्यातील लखनऊ दिल्ली या खासगी रेल्वे गाडीचे प्रवासी भाडे २ हजार ८०० रुपये आहे़ तर शताब्दी रेल्वेचे भाडे १ हजार २०० ते १ हजार ४०० रुपये आहे़ म्हणजे खासगी कंपनीच्या रेल्वेचे भाडे भारतीय रेल्वेपेक्षा दुप्पट आहेत़ तसेच ही रेल्वे सरकारी गाडीपेक्षा कमी वेळेत दिल्लीला पोहचते असे नाही़ हा अनुभव पाहता १५१ खासगी रेल्वे गाड्या चालवण्यास परवानगी देणे हा निर्णय बड्या कार्पोरेटसाठी आणि देशाची सार्वजनिक उद्योग, रेल्वे, संरक्षण कारखाने, कोळसा पाणी हे बड्या कंपन्यांना लुटण्यासाठी मोकळी करुन देण्याचा प्रकार आहे़ रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची पिळवणूक करणारा हा निर्णय मागे घ्यावा़ क आणि ड वर्गाची रिक्त पदे रद्द करण्याची आणि नवीन पदनिर्मितीवर प्रतिबंध आणणारे परिपत्रक मागे घ्यावे असेही या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे़रेल्वेचे स्टेशन प्रबंधक संतोष जाधव यांना निवेदन सादर करण्यात आले आहे़ त्यावेळी कॉ़ एल़ आऱ राव, कॉ़ पोपटराव चौधरी, कॉ़ प्रशांत वाणी, इंटकचे प्रमोद सिसोदे, कॉ़ योगेश्वर माळी, कॉ़ दीपक सोनवणे आदी उपस्थित होते़
रेल्वेच्या खासगीकरणाचा निर्णय मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 22:17 IST