धुळ्यात निवृत्त मुख्याध्यापकाचे घर फोडले, सव्वा लाखांचा ऐवज लंपास
By देवेंद्र पाठक | Updated: July 16, 2023 17:40 IST2023-07-16T17:40:43+5:302023-07-16T17:40:59+5:30
घराला लावलेले कुलूप तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान करत घरातील कपाटही फोडले.

धुळ्यात निवृत्त मुख्याध्यापकाचे घर फोडले, सव्वा लाखांचा ऐवज लंपास
धुळे : घर बंद असल्याची संधी साधून चाेरट्याने घर फोडले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त करत रोख रकमेसह दागिने असा एकूण १ लाख १७ हजारांचा ऐवज लांबविला. ही घटना शनिवारी पहाटे घडली. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अशोक यशवंत नांद्रे या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, भाडणे शिवारात नवापूर रोडवर नवनाथ नगरातील प्लाॅट नंबर १३ मध्ये नांद्रे यांचे निवासस्थान आहे. ते आपल्या परिवारासोबत बाहेरगावी गेले होते. ही संधी चोरट्याने साधली.
घराला लावलेले कुलूप तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान करत घरातील कपाटही फोडले. त्यात ठेवलेले सोन्याची चैन, कानातले टोंगल, अंगठी, मण्यांची माळ आणि १२ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख १७ हजारांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. चोरीची ही घटना शुक्रवारी सकाळी ११ ते शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.
नांद्रे परिवार बाहेर गावाहून घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती साक्री पोलिसांना कळविण्यात आली. घटनेचा पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी अशोक नांद्रे यांनी साक्री पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने चाेरट्यांविरोधात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक गणेश कोळी घटनेचा तपास करीत आहेत.