४५ वर्षांवरील लसीकरणाला दुसऱ्या दिवशी प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:32 IST2021-04-03T04:32:24+5:302021-04-03T04:32:24+5:30
धुळे - जिल्ह्यात ४५ वर्षांवरील नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी लसीकरणाच्या पहिल्या दिवशी मात्र ज्येष्ठ नागरिकांचा अल्प ...

४५ वर्षांवरील लसीकरणाला दुसऱ्या दिवशी प्रतिसाद
धुळे - जिल्ह्यात ४५ वर्षांवरील नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी लसीकरणाच्या पहिल्या दिवशी मात्र ज्येष्ठ नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी ४ हजार ६०३ नागरिकांनी लस घेतली. लसीकरणाची २१ केंद्रे वाढविण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने लसीकरण केंद्रांमध्ये वाढ होणार आहे.
४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण गुरुवारपासून सुरू झाले आहे. गुरुवारी १ हजार १७४ नागरिकांनी लस घेतली होती. कोविशिल्ड लसीचे ३३ हजार डोस आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या सात लाखांपेक्षा जास्त असल्याने आणखी ९२ लसीकरण केंद्रे वाढविण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २१ केंद्रे वाढविण्यात आली असून, आणखी १९ केंद्रे आठवडाभरात वाढविण्यात येतील, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली.
शुक्रवारी ४५ ते ६० या वयोगटातील ३ हजार ९०९ व ६० वर्षांवरील ६९४ नागरिकांनी लस घेतली. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी मात्र लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळाला होता. एकूण १ हजार ३८६ नागरिकांनी लस घेतली होती. त्यात ४५ ते ६० या वयोगटातील ७८५ व ६० वर्षांवरील ३८९ ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.
गुरुवारी यामुळे कमी झाले लसीकरण-
गुरुवारी कोविशिल्ड लसीचे ३३ हजार डोस आरोग्य विभागाला प्राप्त झाले. मात्र, दुपारनंतर डोस प्राप्त झाले होते, तसेच आरोग्य केंद्रांवर साठा कमी होता. जिल्ह्यातील ६३ केंद्रांवर सध्या लसीकरण सुरू आहे. लसीकरण केंद्रांची संख्या वाढल्यानंतर लसीकरणात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
७ लाख २२ हजारांचे उद्दिष्ट -
जिल्ह्यात ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या ७ लाख ४२ हजार इतकी आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ८ लाख डोसची मागणी राज्य शासनाकडे केली होती. त्यापैकी कोविशिल्डचे ३३ हजार ५०० डोस गुरुवारी प्राप्त झाले आहेत. टप्प्या-टप्प्याने लसीचा पुरवठा होणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ६८ हजार ५०५ नागरिकांनी पहिला डोस, तर ७ हजार ६१९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. यात आरोग्य कर्मचारी, फ्रँटलाइन कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.