नियोजित कृषी विद्यापीठ होण्यासाठी जिल्हा प्रशासनाला स्मरणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:27 IST2021-01-10T04:27:33+5:302021-01-10T04:27:33+5:30
धुळे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन करून निर्माण होणारे नवीन कृषी विद्यापीठ धुळ्यातच व्हावे, यासाठी सहा वर्षांपासून ...

नियोजित कृषी विद्यापीठ होण्यासाठी जिल्हा प्रशासनाला स्मरणपत्र
धुळे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन करून निर्माण होणारे नवीन कृषी विद्यापीठ धुळ्यातच व्हावे, यासाठी सहा वर्षांपासून नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांना स्मरण निवेदन देण्यात येत आहे. यंदाही समितीचे निमंत्रक प्रा.शरद पाटील यांनी स्मरणपत्र देऊन प्रशासनाला मागणीसंर्दभात आठवण करून दिली.
धुळ्यातील कृषी महाविद्यालयात सर्व सुविधा व विद्यापीठांसाठी आवश्यक आराखडा तयार असल्याने नियोजित कृषी विद्यापीठ धुळ्यात व्हावे, या मागणीसाठी माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषी विद्यापीठ निर्माण कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून गेल्या साडेचार वर्षांपासून कृषी विद्यापीठ धुळ्यात व्हावे, यासाठी पाठपुरावा केला जात आहे. शहराच्या सीमेला लागून कृषी महाविद्यालयाची ७५० एकर जमीन असून, तालुका पिंप्री फार्मची १०० एकर आणि शासकीय शेतकी शाळेची १०० एकर जमीन महाविद्यालयाच्या परिसरात उपलब्ध आहे. विद्यापीठ स्थापनेसाठी लागणारे सर्व विभाग, प्रयोगशाळा, वसतिगृह, क्रीडांगण, विकसित झालेली हॉर्टिकल्चर नर्सरी आज उपलब्ध आहे. धुळे विभाग कोरडवाहू असल्याने पिकांवरील संशोधन व हवामान बदलानुसार पीक पद्धती संशोधनासाठी धुळ्यात अनुकूल आहे. त्यामुळे धुळ्यात कृषी विद्यापीठ उभारले गेल्यास संशोधनास मोठी चालना मिळेल, या सर्व बाबी लक्षात घेऊन कृषी समितीकडून कृषी विद्यापीठाच्या घोषणेसाठी पाठपुरावा सतत सुरू आहे. खान्देशातील एकही लोकप्रतिनिधी कृषी विद्यापीठ हाेण्यासाठी आग्रही नसल्याने विद्यापीठाचा निर्णय लांबणीवर पडला आहे. कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीने आतापर्यंत नवीन कृषी विद्यापीठाच्या मागणीसाठी सतत ११ वर्षांपासून पाठपुरावा सुरू ठेवला आहे. प्रशासनाकडून आतातरी कृषी विद्यापीठाचा विषय मार्गी लावावा, अशी मागणी प्रा. शरद पाटील यांनी केली.