देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी अथक प्रयत्न - भाजपा नेते कैलास विजयवर्गीय
By देवेंद्र पाठक | Updated: June 5, 2023 17:10 IST2023-06-05T17:10:07+5:302023-06-05T17:10:35+5:30
देशाच्या सुरक्षासंदर्भात भारत देश तिसऱ्यास्थानी असून अर्थ व्यवस्थेत पाचव्यास्थानी आहे असं कैलास विजयवर्गीय म्हणाले.

देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी अथक प्रयत्न - भाजपा नेते कैलास विजयवर्गीय
धुळे - संपूर्ण देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी गेल्या ९ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अथक प्रयत्न केले. विविध क्षेत्रांत केलेली कामगिरी ही संपूर्ण जगात उल्लेखनीय ठरली. सामान्यांना जी आश्वासने दिली ती जवळपास पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकारने केला असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी पत्रकार परिषदेत केला.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला तब्बल ९ वर्षे झाले आहेत. या ९ वर्षांत केलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखा सादर करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विजयवर्गीय धुळ्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. प्रदेश सरचिटणीस विजय चाैधरी, खा. डाॅ. सुभाष भामरे, आ. जयकुमार रावल, महापौर प्रतिभा चौधरी, शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, प्रदीप कर्पे, यशवंत येवलेकर आदी उपस्थित होते.
विजयवर्गीय म्हणाले, कोरोनाच्या कार्यकाळात संकटावर मात करत असतानाच मंदीच्या लाटेत सक्षमपणे उभे राहण्याचा प्रयत्न केला. उद्योग, उत्पादन आणि इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये सहभाग नोंदविला. भारताचा जीडीपी उंचाविण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक क्षेत्रात विकासासाठी प्रयत्न केले. २०१४ पूर्वी देशाच्या सुरक्षेसंदर्भात आयात केले जात होते. पण त्याच बाबी आपण निर्यात करत आहोत. कोरोना काळात आपण स्वत: व्हॅक्सिन बनविले. आपण ते शंभर देशात निर्यातदेखील केले. गरीब कल्याणाच्या विविध योजना राबवून त्यांचे जीवनमान उंचाविले. दलाल संस्कृती संपुष्टात आणल्यामुळे योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत मिळू लागला. भ्रष्टाचार रोखला. भ्रष्टाचार होऊ दिला नाही. राममंदिराचा प्रश्न तडीस नेला. जानेवारी २०२४ मध्ये रामाचे दर्शन प्रत्येक भारतीय घेऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशाच्या सुरक्षासंदर्भात भारत देश तिसऱ्यास्थानी असून अर्थ व्यवस्थेत पाचव्यास्थानी आहे. भारताने संपूर्ण देशात आपले स्थान अबाधित ठेवले आहे. संपूर्ण जगात भारत देशाने आपले स्थान उंचावले आहे. निवडणुकीच्या काळात जी आश्वासने नागरिकांना दिली होती. ती जवळपास पूर्ण करण्याचा प्रयत्न मोदी सरकारन केलेला आहे, असेही कैलास विजयवर्गीय यांनी स्पष्ट केले.