अक्कलपाडा धरणातून आवर्तन सोडल्याने पांझरा नदी झाली प्रवाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 11:50 IST2019-05-15T11:49:28+5:302019-05-15T11:50:22+5:30
आतापर्यंत १२५ टीएमसी पाणी सोडले, ४० गावांना होणार फायदा

अक्कलपाडा धरणातून आवर्तन सोडल्याने पांझरा नदी झाली प्रवाही
आॅनलाइन लोकमत
धुळे : गेल्यावर्षी झालेल्या कमी पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांमध्ये पाणीच शिल्लक नाही. भीमा, कृष्णा, गोदावरी, तापी यासारख्या मोठ्या नद्यांच्या पात्रांमध्येही उन्हाळ्यात काही ठिकाणी ठणठणाट आहे. धुळे जिल्हयातून वाहणाऱ्या पांझरा नदीचे पात्रही पावसाळ्यातही कोरडठाक होते. मात्र नुकतेच अक्कलपाडा धरणातून आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे पांझरा नदी ऐन दुष्काळातही वाहत असल्याचे दिलासादायक चित्र बघावयास मिळत आहे. ऐन टंचाईच्या काळात नदी खळखळून वाहन आहे.
गेल्यावर्षी झालेल्या अल्पशा पावसामुळे ऐन पावसाळ्यातही पांझरा नदीला पूर आला नव्हता. याचवर्षी अक्कलपाडा धरणातून सोडलेल्या आवर्तनाचा कालावधी वगळता नदीपात्र गेल्या दीडवर्षांपासून कोरडेठाक पडलेले आहे. नदीत स्वच्छ पाण्याऐवजी गटारीचेच पाणी जास्त आहे. त्यामुळे पांझरा नदी की गटारगंगा असाही काहींना प्रश्न पडत असतो.
पांझरा नदीकिनारी धुळ्यासह जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या विहिरी आहेत. पांझरा नदी किनारी असलेल्या गावांना गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानुसार अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार पाटबंधारे विभागाने गेल्या शुक्रवारी (दि.१० मे) अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात ३२५ टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. त्यात आतापर्यंत १२५ टीएमसी पाणी सोडले असून, अजून २०० टीएमसी पाणी सोडणे बाकी आहे. सद्यस्थितीत धरणातून प्रत्येक सेकंदाला ४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
धरणातून सोडलेले पाणी तीन दिवसानंतर म्हणजे सोमवारी शहरात पोहचले.
शहरातही पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. पाण्यासाठी काही भागात नागरिकांची भटकंती सुरू आहे. अशा स्थितीत कोरड्या असलेल्या पांझरा नदीपात्रात पाणी आले आहे. भर उन्हाळ्यातही नदीपात्र प्रवाही झाल्याचे बघून अनेकांना दिलासा मिळालेला आहे. बारामाही वाहणाºया राज्यातील काही नद्यांचे पात्र कोरडे पडलेले असतांना पांझरा नदीत पाणी वाहत असल्याचे आल्हादायक चित्र शहरात बघावयास मिळत आहे. नदी वाहते आहे म्हणून काहीजण सायंकाळी नदीलगत फिरायला येऊ लागले आहेत. नदीचा खळखळाट अनेकांना आकर्षिक करू लागला आहे.