दिवसा रेकी अन् रात्री हातसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 22:23 IST2019-11-29T22:23:11+5:302019-11-29T22:23:31+5:30
गुजरातचे दोन तर धुळ्याचा एक जेरबंद : पोलीस अधीक्षक यांची माहिती

दिवसा रेकी अन् रात्री हातसफाई
धुळे : शहरातील कॉलनी आणि गल्लींमध्ये विळी आणि अन्य लोखंडी साहित्याची विक्री करत असताना रेकी करायची़ बंद घर दिसल्यानंतर त्या भागात पाळत ठेवायची आणि रात्री घरफोडी करायची़ असा प्रकार गुजरातच्या शिकलकर टोळीने सुरु केला होता़ त्यांना मोराणे ता़ धुळे येथील तरुणाची साथ होती असे तपासात समोर आले़ घरफोडी करणाºया या तिघांना एलसीबीने ताब्यात घेतले आहे़ अशी माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांचे पथक उपस्थित होते़
दिवाळीपासूनच चोरीचे प्रमाण वाढलेले होते़ ते रोखण्यासाठी कसोशिने प्रयत्न करीत असताना यश मिळत नव्हते़ चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांची गस्त वाढविली होती़ ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली़ चोरट्यांना पकडण्याच्या विशेष सुचना स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आल्या होत्या़ त्यानुसार विभागाने गस्तीचे प्रमाण वाढविले़ ज्या ठिकाणी घरफोडी झाल्या आहेत त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेराचा आधार घेतला़ त्यानुसार तपास करीत धुळे तालुक्यातील मोराणे येथील तिरमलसिंग श्यामसिंग शिकलकर (३५) याला ताब्यात घेतले़ त्याची चौकशी केली असता सुरत येथील काही संशयित असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार, पथकाला सूचना करुन सुरत येथे सांगितलेल्या ठिकाणी सापळा लावण्यात आला़ यात सत्तुसिंग कारुसिंग भादा (१९) आणि ललकारसिंग जलसिंग शिकलीकर (२२) (दोन्ही रा़ प्रभू नगर, उधना, सुरत) या दोघांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले़ दरम्यान, या तिघांची चौकशी केली असता अमरसिंग समशेरसिंग शिकलीकर आणि जसबीरसिंग (दोघेही रा़ गुजरात) यांच्या मदतीने घरफोड्या केल्या असल्याची कबुली पकडण्यात आलेल्या संशयितांनी दिली़ त्यांच्याकडून चोरीला गेलेला ४८ हजार ८५४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़ पांडव प्लाझा, सिंधी कॉलनी येथील घरफोडीचा त्यात समावेश आहे़
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले आणि नथ्थू भामरे, रफिक पठाण, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, कुणाल पानपाटील, संजय पाटील, अशोक पाटील, राहुल सानप, उमेश पवार, रविकिरण राठोड, विशाल पाटील, विलास पाटील, दीपक पाटील, महेश मराठे, मयूर पाटील, तुषार पारधी, किशोर पाटील, योगेश जगताप, सागर शिर्के यांनी ही कारवाई केली़
अन्य गुन्हे होऊ शकतात उघड
चेनस्नॅचिंग करणारा संशयित तनवीरअली अकतरअली जाफरी (रा़ अमळनेर, जि़ जळगाव) याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे़ त्याच्या चौकशीतून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे़
साक्री आणि परिसरात घरफोडी करणारा संशयित किस्मतसिंग भादा याला देखील जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे़
धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने बैरागी नामक चोरट्यांची गँग जळगाव पोलिसांनी पकडली आहे़ चौकशीकामी त्यांना धुळ्यात आणले जावू शकते़
दुचाकी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने ते ही रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत़ नागरीकांनी देखील आपल्या वाहनांची काळजी घ्यायला हवी़