शेतजमिनीवर बाेजा असताना परस्पर विक्री; पिंपळनेर येथील घटना
By देवेंद्र पाठक | Updated: May 20, 2023 18:42 IST2023-05-20T18:41:40+5:302023-05-20T18:42:01+5:30
तिघांवर गुन्हा

शेतजमिनीवर बाेजा असताना परस्पर विक्री; पिंपळनेर येथील घटना
देवेंद्र पाठक, धुळे: शेतजमिनीवर बोजा असल्याचे माहीत असूनही शेतजमिनीची परस्पर विक्री करण्यात आली. भारतीय स्टेट बँक शाखा पिंपळनेरची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तसेच शेतजमीन विकत घेणाऱ्या अशा तीन जणांविरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
भारतीय स्टेट बँक शाखा पिंपळनेरचे शाखाधिकारी मनोज देशमुख यांनी या विषयीची फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, मिलाबाई आत्माराम काेकणी - चौधरी (वय ६०, रा. निरगुडीपाडा, ह. मु. भोयेनगर, पिंपळनेर) यांच्या मालकीच्या शेतजमिनीवर भारतीय स्टेट बँक शाखा पिंपळनेरकडील ४ लाखांचा बोजा हाेता. बोजा असल्याचे माहीत असतानाही तो बुडविण्याच्या इराद्याने साक्री तालुक्यातील शिवपाडा येथील एकाच्या मदतीने शेतजमिनीच्या दस्तऐवजात फेरफार करण्यात आला. तसेच ही शेतजमीन साक्री तालुक्यातील जामखेल येथील एकाच्या नावावर करण्यात आली.
दरम्यान, बँकेच्या बोजासंबंधी संबंधित तिघांना नेाटीस बजावूनदेखील त्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे दाखल फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे घटनेचा तपास करत आहेत.