पहिल्या टप्प्यात सव्वालाख पाठ्यपुस्तके प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 11:29 IST2019-05-18T11:29:00+5:302019-05-18T11:29:50+5:30
समग्र शिक्षा अभियान : शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप होणार

dhule
धुळे : पुढील महिन्यात शाळा सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात ११ विषयांची पहिली ते सहावीपर्यंतची जवळपास १ लाख २० हजार पुस्तके आल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली आहे.
दरवर्षी सर्व शिक्षा अभियानांतर्गत ही पुस्तके दिली जात होती. मात्र आता पहिली ते बारावीपर्यंतचा समावेश समग्र शिक्षा अभियानात करण्यात आलेला असून, त्यांच्यामार्फतच मोफत पाठ्य पुस्तकांचा पुरवठा होतो.
पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यात येतात. यासाठी शिक्षण विभागाने पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी जिल्हा परिषदेतर्फे २ लाख ३५ हजार १७० पुस्तक संचाची मागणी नोंदविण्यात आली आहे. यात धुळे तालुक्यासाठी ६० हजार ५४३, शिंदखेडा तालुक्यासाठी ४० हजार ३१५, साक्री तालुक्यासाठी ७१ हजार ७५०, व शिरपूर तालुक्यासाठी ६१ हजार ३५४ पुस्तकांचा समावेश आहे.
दरम्यान मागणी केल्यानुसार बालभारतीतर्फे पुस्तकांचा पुरवठा सुरू झालेला आहे. आतापर्यंत मागणी केलेल्या पुस्तकांपैकी फक्त २५ टक्के पुस्तके प्राप्त झालेली आहेत. ही पुस्तके दुधेडिया हायस्कुलमध्ये ठेवण्यात आलेली आहेत.
पहिली ते तिसरीपर्यंत मराठी, इंग्रजी गणित, शिवाय तिसरीचे खेळू-करू,शिकू, चौथीचे मराठी व परिसर अभ्यास भाग-१, दहावीचे इतिहास, विज्ञान, गणित, हिंदी अशी एकूण १ लाख २० हजार पुस्तके प्राप्त झालेलेी आहेत. जवळपास ९० टक्के पुस्तके आल्यानंतरच त्यांचे वितरण सुरू होणार आहे.
इयत्ता पाचवी, सातवी आठवीचे सर्व विषयांचे पुस्तके येणे अजून बाकी आहेत. त्याचबरोबर चौथी आणि सहावीचे काही विषयांची पुस्तकेही अद्याप आलेले नाहीत. त्याचबरोबर उर्दू माध्यमांची व सेमी इंग्रजीचीही पुस्तके अजून आलेली नाहीत.
दरम्यान बालभारतीतर्फे आता पुस्तकांचा पुरवठा सुरू झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये सर्व इयत्तांची सर्व विषयांची पुस्तके मिळतील. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्य पुस्तकांचे वाटप करण्यात येईल, यादृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन केलेले आहे. पुस्तक मिळत असल्याने, पहिल्यादिवशी शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्य प्रमाणात असते.
पुस्तक परत करीत नाही
विद्यार्थ्यांना देण्यात येणारी मोफत पुस्तके परत केलीच जात नाही. बोटावर मोजण्याएवढेच विद्यार्थी शाळांना पुस्तके परत करीत असतात. ते पुस्तक इतर गरीब विद्यार्थ्यांना दिली जातात.
दोंडाईचासाठी ४७ हजार ४४३ पुस्तकांची मागणी
*समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीतील सर्व शासकीय शाळा, आणि अनुदानित खासगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके पुरविण्यात येणार आहेत .
दोंडाईचात विविध शाळातील मराठी माध्यमांचे ५ हजार ९५०, उर्दू माध्यमातील १३०० अशा ७ हजार २५० विद्यार्थ्यांना अनुक्रमे ३९ हजार ५९८ व ७ हजार ८४५ अशी एकूण ४७ हजार ४४३ पुस्तकाचे वाटप होणार आहे .
शाळेच्या पहिल्याच दिवशी दोंडाईचासह शिंदखेडा तालुक्यात विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके मिळणार आहेत. या वर्षी दुसरीची पाठयपुस्तके या वर्षी बदलली आहेत. समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठपुस्तक ही योजना सुरू केली आहे. तीन महिन्यापूर्वी पुस्तक संचची मागणी बालभारतीकडे केली. विद्यार्थ्यांना वेळेवर पुस्तके मिळतील असे नियोजन केले आहे. प्रथम तालुकास्तरावर पुस्तके येणार असून तेथून शाळास्तरावर वाटप होईल.
* शिंदखेडा तालुक्यातील विविध शाळातील पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमाचे ३८ हजार ४९५ व उर्दू माध्यमाचा १८२० अशा ऐकून ४० हजार ३१५ विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे २ लाख १५ हजार ६७२ व ११ हजार ३४८ अशा एकूण २ लाख २७ हजार पुस्तकाची मागणी केल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी मनीष पवार, विस्तारधिकारी डी. एस. सोनवणे, दोंडाईचा केंद्र प्रमुख मोहन मोरे यांनी दिली .