‘ई-पास’साठी कारणे दोनच, रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:59 IST2021-05-05T04:59:12+5:302021-05-05T04:59:12+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, राज्य शासनाने कडक निर्बंध जाहीर करून जिल्हाबंदी केलेली आहे. त्यामुळे नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता ...

‘ई-पास’साठी कारणे दोनच, रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार!
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, राज्य शासनाने कडक निर्बंध जाहीर करून जिल्हाबंदी केलेली आहे. त्यामुळे नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येत नाही. मात्र, अंत्यसंस्कार अथवा वैद्यकीय कारण असल्यास अशांसाठी ई-पासचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी बाहेर जाता येते. मात्र, त्यासाठी ई-पास असणे गरजेचे आहे. ई-पास नसल्यास चेकपोस्टवर तैनात असलेले पोलीस पुढील प्रवास करू देत नाहीत.
प्रत्येक जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांतर्फे ई-पासची खात्री केल्यानंतरच वाहनांना जाण्यास परवानगी देण्यात येते. मात्र, माल वाहतूक तसेच एस.टी. महामंडळाच्या बसगाड्यांना ई-पासची आवश्यकता नाही.
ही कागदपत्रे हवी
लग्नकार्य असेल तर लग्नपत्रिका, प्रत्येकाचा कोरोना चाचणी अहवाल, हॉस्पिटलचे काम असेल तर त्याची कागदपत्रे, मेडिकलचे काम असेल तर त्याचा पुरावा, प्रत्येकाचे आधार कार्ड ही कागदपत्रे जोडावी लागतात.
ई-पाससाठी अर्ज करताना नागरिक रुग्णालयात नातेवाइकाला पाहण्यास जाण्यासाठी, जवळचे व लांबच्या नातेवाइकांचे निधन झाले म्हणून त्यांच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी, लग्नकार्यासाठी, तर काही लोक कामाला जाण्याकरिता अर्ज करत आहेत. एकंदरीत हीच कारणे जास्त करून ई-पाससाठी दिली जात आहेत.
ई-पाससाठी असा करावा अर्ज
ई-पास हवा असलेल्या नागरिकांनी covid.mhpolice.in या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे, ते पोलीस आयुक्तालय अथवा जिल्हा पोलीस विभाग निवडावा. त्यानंतर स्वत:चे नाव, कोणत्या तारखेपासून प्रवास करायचा आहे ते लिहून, मोबाईल क्रमांक, प्रवासाचे कारण, वाहन क्रमांक, सध्याचा पत्ता, ई-मेल, प्रवास प्रारंभ ठिकाण ते अंतिम ठिकाण, सोबतच्या प्रवाशांची संख्या याची माहिती द्यावी.
२४ ते ४८ तासांत मिळतो ई-पास
ई-पाससाठी अर्ज केल्यानंतर त्याची सायबर सेलमध्ये तपासणी केली जाते तसेच जोडलेली कागदपत्रे जर योग्य असतील, तर प्रवासाच्या तारखेपर्यंत ४८ ते २४ तास अगोदर मंजुरी दिली जाते. ई-पासची सुविधा उपलब्ध असल्याने, संचारबंदीच्या काळात प्रवास करता येतो.
तीच ती कारणे
खासगी वाहनांना जिल्हाबंदी असल्याने व जाणे आवश्यक असल्याने, बहुतांशजण रुग्णालयाचे कारण नमूद करीत आहेत. यानंतर अंत्यसंस्कारासाठी जायचे असल्याचेही नमूद केले जाते.