रेशन दुकानदार करतात गरिबांचे धान्य हडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:23 IST2021-07-09T04:23:42+5:302021-07-09T04:23:42+5:30
धुळे : येथील काही रेशन दुकानदार ग्राहकांच्या युनिटमध्ये कपात करून गरिबांचे धान्य हडप करीत असल्याची गंभीर तक्रार समाजवादी पार्टीने ...

रेशन दुकानदार करतात गरिबांचे धान्य हडप
धुळे : येथील काही रेशन दुकानदार ग्राहकांच्या युनिटमध्ये कपात करून गरिबांचे धान्य हडप करीत असल्याची गंभीर तक्रार समाजवादी पार्टीने तहसीलदारांकडे केली आहे. समाजवादी पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाबाहेर नुकतीच निदर्शने केली. यावेळी तहसीलदारांना तक्रारी निवेदन देण्यात आले. त्यात स्वस्त धान्य दुकान क्रमांक ११, १४, १५, २८, ३१, ३२, ३३, ३६, ३९, ४६, ५४, ६९ आदी दुकानांचा उल्लेख करण्यात आला आहे. अनेक स्वस्त धान्य दुकानदारांकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. रेशनकार्डधारक लाभार्थींना विनाकारण त्रास देण्याचे सत्र रेशन दुकानदारांनी चालविले आहे. थम्ब देऊनही पावती न देता साध्या कागदावर नोंद घेऊन धान्य दिले जाते. विचारणा केल्यावर अरेरावी केली जाते. धान्याच्या मंजुर कोट्याबाबत पुरेशी माहिती ग्राहकांना दिली जात नाही. मिळेल तेवढ्या धान्यावर ग्राहकांना समाधान मानावे लागते, अशा एक ना अनेक तक्रारी निवेदनात केल्या आहेत.
मापात पाप करणाऱ्या रेशन दुकानदारांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष आसिफ मन्सुरी, नगरसेवक अमिन पटेल, डाॅ. सरफराज अन्सारी, इनाम अहमद सिद्दिकी, अकील अन्सारी, गुलाम कुरेशी, जमिल मन्सुरी, अकील शाह, बुड्डू काकर, नवीन अन्सारी, रफिक शाह, निहाल अन्सारी आदींनी केली आहे.