धुळे : ई-पॉस मशीनवर थंब उमटत नसल्याने अनेक रेशनधारकांना धान्य मिळत नसल्याची तक्रार बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसळ यांना नुकतेच निवेदन देण्यात आले असून, रेशनधारकांच्या समस्येचे निराकरण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सरकारमान्य रेशन दुकानात थंब होत नसल्याने अनेक नागरिकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच कुटुंबातील काही सदस्यांनाच धान्य मिळत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. उर्वरित धान्य रेशन दुकानातच पडून राहत असल्याने काळाबाजार वाढला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. काही रेशन दुकानदार धान्याची काळ्या बाजारात विक्री करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे. आधीच काेरोनामुळे जनता आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे शासन त्यांना पुरेसे धान्य मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, रेशन दुकानदार शासनाच्या धोरणाच्या विपरीत वागताना दिसत आहेत. सामान्य जनतेच्या हक्काचे धान्य त्यांना मिळावे, यासाठी योग्य कार्यवाही करावी. अन्यथा पुरवठा विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करू तसेच मंत्रालयात तक्रार करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर सुलतान अन्सारी, युसूफ शेख, जमील शेख, सलीम अली, सोनिया कुमावत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.