Ramdas Athawale: “नरेंद्र मोदींना हरवणे शरद पवार किंवा शिवसेनेचे काम नाही”: रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 00:30 IST2021-11-06T00:29:27+5:302021-11-06T00:30:36+5:30
संजय राऊत यांच्या टीकेला केंद्रीयमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रत्युत्तर दिले.

Ramdas Athawale: “नरेंद्र मोदींना हरवणे शरद पवार किंवा शिवसेनेचे काम नाही”: रामदास आठवले
धुळे: केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपात (Petrol Diesel Price Cut) करून देशवासीयांना दिवाळीची मोठी भेट दिली. मात्र, यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखी कमी करायचे असतील, तर भाजपला देशात पराभूत करावे लागेल, असे म्हटले होते. या वक्तव्याचा केंद्रीयमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी समाचार घेत, नरेंद्र मोदींना हरवणे शरद पवार किंवा शिवसेनेचे काम नाही, असा खोचक टोला लगावला.
केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली. पण ही दर कपात पोटनिवडणुकीतील भाजपच्या पराभवाचे फलित आहे. आता ५ रुपयांची पेट्रोल स्वस्त झाले आहे. पण ५० रुपयांनी स्वस्त करायचे असेल तर आपल्याला संपूर्ण देशभर भाजपाचा पराभव करावा लागेल आणि २०२४ साली ते नक्कीच होईल, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला होता. संजय राऊत यांच्या टीकेला केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिले. ते धुळ्यात बोलत होते.
नरेंद्र मोदींना हरवणे शरद पवार किंवा शिवसेनेचे काम नाही
नरेंद्र मोदी यांना हरवणे शिवसेना किंवा शरद पवार यांचे काम नाही. दादरा नगर हवेली येथील लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला. मात्र, सहानुभूतीच्या लाटेमुळे शिवसेनेचा उमेदवार जिंकून आला. या यशावर शिवसेनेने भारावून जाऊ नये, असा खोचक टोला रामदास आठवले यांनी लगावला. तसेच धुळ्यात भाजपचे माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल हे पुन्हा आमदार होतील, असा विश्वास आठवले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
दरम्यान, भाजपाला तुम्ही जितका वेळ पराभूत करणार तितका पेट्रोल आणि डिझेलचा भाव कमी होत राहणार. ही लूट थांबवायची असेल तर भाजपाला पराभूत करा. केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करताना पेट्रोलचा भाव ५ रुपयांनी कमी केला तर डिझेलचा भाव १० रुपयांनी कमी केला. यामुळे केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर जी लूट केली जात होती ती काही प्रमाणात कमी झाली आहे, असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.