ऐन पावसाळ्यात ग्रामीण भागात प्रचाराची रणधुमाळी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:39 IST2021-09-22T04:39:57+5:302021-09-22T04:39:57+5:30

२०२० मध्ये जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या चार पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या होत्या. यात जिल्हा परिषदेत भाजपने प्रथमच ...

In the rainy season, the campaign begins in rural areas | ऐन पावसाळ्यात ग्रामीण भागात प्रचाराची रणधुमाळी सुरू

ऐन पावसाळ्यात ग्रामीण भागात प्रचाराची रणधुमाळी सुरू

२०२० मध्ये जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या चार पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या होत्या. यात जिल्हा परिषदेत भाजपने प्रथमच स्वबळावर सत्ता मिळविली होती. तर धुळे, शिंदखेडा, शिरपूर पंचायत समितीतही भाजपने आपले वर्चस्व राखले होते. मात्र आरक्षणाच्या मुद्यावरून जिल्हा परिषदेचे १५ व चारही पंचायत समितीचे ३० अशा एकूण ४५ जणांचे सदस्यत्व रद्द झाले. या रिक्त जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोट निवडणुकीचा कार्यक्रम जुलैमध्ये जाहीर केला होता. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाने ९ जुलै रोजी पोटनिवडणुकीला स्थगिती दिली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, १३ सप्टेंबरपासून पोट निवडणुकीचा कार्यक्रम पुन्हा सुरू झालेला आहे.

जिल्हा परिषदेच्या ज्या १५ जागा आहेत, त्यात धुळे तालुक्यातील ११ व शिंदखेडा तालुक्यातील चार जागांचा समावेश आहे. त्यामुळे धुळे तालुक्यावरच सर्वच पक्षांचे लक्ष केंद्रित झालेले आहे. धुळे तालुक्यातील भाजपचे ९ व शिवसेनेच्या दोन उमेदवारांचे सदस्यत्व रद्द झालेले आहे. भाजपने एका गटाच्या जागेत बदल करीत उर्वरित तेच उमेदवार कायम ठेवलेले आहेत.

दरम्यान आता उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया बाकी राहिलेली आहे. असे असले तरी सर्वच पक्षांचे उमेदवार ठरलेले असून, त्यांनी आता आपापल्या गटात प्रचार सुरू करून दिलेला आहे . प्रचारात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे. सत्ताधारी व विरोधक याच मुद्द्यांवरून एकमेकांवर टीका करीत आहेत. या व्यतिरिक्त प्रचाराला फारसे मुद्देही नसल्याने, या निवडणुकीत पाहिजे तसा रंग येताना दिसत नाही.

असे असले तरी उमेदवारांनी आपल्या वैयक्तिक पातळीवर प्रचाराची धुरा सांभाळलेली आहे. सकाळी व सायंकाळी मतदारांच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत. अनेक उमेदवारांनी प्रचारासाठी अनंत चतुर्दशीचा मुहूर्त साधला होता. उमेदवारांनी विसर्जन स्थळी आवर्जून जात त्याठिकाणी प्रचाराची संधी सोडली नाही. एका गावात राष्ट्रवादी व भाजपचे उमेदवार एकाच व्यासपीठावर आल्याने, गावात चांगलीच चर्चा रंगलेली होती.

Web Title: In the rainy season, the campaign begins in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.