जिल्ह्यातील २३७ पैकी २३४ मतदारांनी बजाविला मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 22:22 IST2020-12-01T22:22:00+5:302020-12-01T22:22:50+5:30
पोलिसांचा तगडा बंदोबस्त, मतमोजणीकडे लक्ष लागून

dhule
धुळे : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी धुळे जिल्हयातील चारही केंद्रावर मंगळवारी शांततेत मतदान झाले. सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. दुपारीच मतदानाची प्रक्रीया पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्वच केंद्रावर मतदारांची योग्य ती काळजी घेण्यात आली. जिल्हयातील २३७ पैकी २३४ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ९९ टक्के एवढी राहिली. आता सर्वांचे लक्ष गुरूवारी जाहीर होणाऱ्या मतदानाच्या निकालाकडे लागले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजपमध्ये प्रवेश केल्याने माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही पोट निवडणूक घेण्यात आली. विशेष म्हणजे भाजपतर्फे या जागेवर पुन्हा अमरिशभाई पटेल यांना संधी देण्यात आली. तर काँग्रेसचे अभिजीत पाटील हे महाआघाडीचे उमेदवार आहेत.
आज सकाळी धुळे ग्रामीण तहसील कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य हे एकत्रितपणे खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली मतदान केंद्रावर पायी चालत आले. काँग्रेसचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी देखील धुळ्यातील तहसील कार्यालयातील मतदान केंद्राला भेट देत पाहणी केली. त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, राष्ट्रवादीचे किरण शिंदे आदी उपस्थित होते. शिंदखेडा येथे आमदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली तर शिरपूरला उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे मतदार मतदानासाठी गेले होते. एकाचवेळी सर्व मतदार आल्याने, धुळे येथील मतदान केंद्रावर प्रचंड गर्दी झालेली होती.
कोरानाचे नियम पाळले
कोरोनामुळे सर्व नियम पाळून मतदान प्रक्रीया पार पाडण्यात आली. मतदार, मतदान केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मास्क परिधान केले होते. शाररिक अंतर ठेवून एकाचवेळी गर्दी होणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली होती. प्रत्येक मतदाराचा ताप आणि ॲाक्सिजनची पातळी मोजूनच त्यांना मतदान केंद्रात प्रवेश देण्यात येत होता.
प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचारी असे चार केंद्रावर २० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आल्या आहेत.