कोरोनामुळे हाॅकर्स झोन जागेचा प्रश्न प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 22:24 IST2021-04-03T22:24:24+5:302021-04-03T22:24:40+5:30

खाऊगल्लीचे कामही रेंगाळले

The question of hackers zone space is pending due to Corona | कोरोनामुळे हाॅकर्स झोन जागेचा प्रश्न प्रलंबितच

कोरोनामुळे हाॅकर्स झोन जागेचा प्रश्न प्रलंबितच

धुळे : येथील मुख्य बाजारपेठेत हाॅकर्सची संख्या मोठी आहे. किरकोळ व्यावसायिक पोटापाण्याचा प्रश्न सोडवित असले तरी त्यांच्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, हे नाकारता येणार नाही. हाॅकर्सला जागा देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असला तरी हा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे. शिवाय खाऊगल्लीचे कामदेखील रखडले आहे.
धुळे शहरात आग्रारोड, पाचकंदीलसह इतरही प्रमुख रस्त्यांवर फेरीवाले व्यावसायिक दोन्ही बाजूला उभे राहतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या व्यावसायिकांना स्वतंत्र जागा देण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांची नोंदणी करण्याचे काम करण्यात येत आहे. दुसरीकडे अद्यापही फेरीवाल्यांना स्वतंत्र जागा मिळालेली नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे.
शहरात आग्रारोड, पारोळारोडवर तसेच मुख्य चौकात फेरीवाले व्यावसायिक उभे राहतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ते उभे राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. काही वेळा रस्त्यावरून पायी चालणे देखील जिकीरीचे होते. फेरीवाल्यांना जागा देण्यासाठी महापालिका प्रशासनाने एक समिती नियुक्त केली होती. तसेच व्यावसायिकांसाठी उभे राहण्यासाठी शहरातील काही जागा निश्चित केल्या होत्या. परंतु, या जागांना विरोध झाला होता. आता मनपाच्या प्रकल्प विभागाकडून फेरीवाला व्यावसायिकांची नोंदणी करण्यात येत आहे. नोंदणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन करण्यात येत आहे. परंतु, अजूनही जागेचा प्रश्न प्रलंबित आहे. रस्त्यावर फेरीवाल्यांची संख्या वाढते आहे. 
देवपूर दत्तमंदिर चौक परिसरात पूर्वी मोकळ्या जागेत भाजीबाजार होता. ही जागा खासगी असल्याने बाजार दत्तमंदिर चौकापासून जीटीपी चौकापर्यंतच्या रस्त्यावर भरतो. रहदारीच्या दृष्टीने मोकळा असलेला हा एकमेव रस्ता देखील पथविक्रेत्यांनी काबीज केला आहे. सायंकाळी तर दुचाकी जाईल इतकीच जागा शिल्लक राहते. भाजीपाला खरेदीसाठी आलेल्यांची गर्दी असते.
कारवाई नावालाच
शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी महानगरपालिका तसेच पोलिसांच्या वाहतुक शाखेकडून वेळोवेळी हाॅकर्सवर कारवाई होते. परंतु ही कारवाई केवळ नावालाच असते. कारवाई पथक गेले की लगेच हातगाड्या पुन्हा रस्त्यावर येतात. व्यवसायक करुन पोट भरणाऱ्यांचा पोटमारा होवू नये यासाठी हाॅकर्स झोन त्वरीत करण्याची गरज आहे. 

Web Title: The question of hackers zone space is pending due to Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे