धुळ्यात सहायक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की; एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 22:25 IST2020-12-14T22:24:53+5:302020-12-14T22:25:15+5:30
साक्री रोडवरील पहाटेची घटना, शहर पोलिसात गुन्हा दाखल

धुळ्यात सहायक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की; एकास अटक
धुळे : चौकात का थांबला, निघून जा असे सांगणाऱ्या गस्तीवरील पोलिसांना शिवीगाळ करीत सहायक पोलीस निरीक्षकाला धक्का देण्याची घटना साक्री रोडवरील कुमारनगर परिसरात सोमवारी पहाटे साडेतीन ते पावणेचार वाजेच्या सुमारास घडली. त्याचक्षणी पोलिसी खाक्या दाखवत चंदन ऊर्फ चिन्नू पोपली (रा. कुमार नगर, साक्री रोड) याच्या मुसक्या आवळल्या. त्याला ताब्यात घेण्यात आले. पहाटे साडेपाच वाजताच त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
साक्री रोडवरील कुमारनगर भागातील एका चौकात चिन्नू पोपली हा पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास उभा होता. त्याचवेळेस शहर पोलिसांचे गस्तीवरील पथक तिथे आले. त्यांनी त्याला चौकात का उभा आहे, घरी निघून जा असे सांगितले. पण चिन्नू तिथून न जाता उलट जात नाही, काय करायचे करून घ्या असे उद्धटपणे बोलला. त्याला समजून सांगण्यासाठी गस्तीवर असणारे सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील यांनी आपल्या शासकीय वाहनातून खाली उतरले आणि त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. पण, उलट चिन्नूने पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दादासाहेब पाटील यांचा हात पकडून त्यांना जोराचा धक्का दिला. यावेळी त्यांच्या हाताला खरचटले. शिवीगाळ करत एकेकाला बघून घेईन, जिवंत सोडणार नाही अशीही धमकी दिली.
लागलीच त्याला पोलिसी खाक्या दाखवित त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला ताब्यात घेत असताना शासकीय गणवेशाची दोन बटने तुटली. त्याला शहर पोलीस ठाण्यात आणून त्याच्या विरोधात सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील यांनी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली. त्यानुसार चंदन ऊर्फ चिन्नू पोपली याच्या विरोधात भादंवि कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस. पी. तिगोटे घटनेचा तपास करीत आहेत.