स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोकसहभाग महत्त्वाचा,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:38 IST2021-09-26T04:38:53+5:302021-09-26T04:38:53+5:30

धुळे : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्याची केंद्रीय ...

Public participation important in clean survey campaign, | स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोकसहभाग महत्त्वाचा,

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोकसहभाग महत्त्वाचा,

धुळे : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्याची केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयातर्फे घोषणा झाली आहे. हे अभियान यशस्वी करण्यात नागरिकांनी सहकार्य करावे, असे अवाहन जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांनी व्यक्त केले.

येथील जिल्हा परिषदेत जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता सनियंत्रण समितीची आढावा बैठक नुकतीच झाली. प्रदीप पवार म्हणाले की, स्वच्छता सर्वेक्षण देशव्यापी आहे. ते १ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत होईल. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येईल. सर्वेक्षणात उत्कृष्ट ठरणाऱ्या जिल्ह्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यांची क्रमवारी ठरवण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीअंतर्गत सर्वेक्षणामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीणअंतर्गत झालेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी ग्राह्य धरली जाणार आहे. तसेच हगणदारीमुक्त गावांची पडताळणी, शौचालयांच्या नवीन बांधकामांची पाहणी केली जाणार आहे. सरकारी शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आठवडाबाजार, धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांची स्वच्छतेविषयक प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन प्रतिक्रिया नोंदवली जाईल. स्वच्छाग्रही खुली बैठक, व्यक्तिगत मुलाखती, सामूहिक चर्चा करून प्रतिक्रिया घेण्यात येतील. प्रत्येक गावाची तीन ते चार गावांचे सरपंच, स्वच्छाग्रही, ग्रामपंचायत सदस्य, देखरेख समिती सदस्य, अंगणवाडीसेविका, आशासेविका व शिक्षकांच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे. गावाच्या पाहणीदरम्यान गावाची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन स्थिती व कचरा व्यवस्थापनासाठी गावपातळीवर राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती घेतली जाईल, असेही पवार या वेळी म्हणाले.

या वेळी स्वच्छता अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. लोकसहभागातून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यशाळेला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Public participation important in clean survey campaign,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.