धुळे : हैदराबादचे खासदार तथा एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद धुळ्यातही उमटले. शहराचे आमदार फारुक शाह यांच्या नेतृत्वाखाली एमआयएम पक्षाने मोर्चा काढून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी आमदारांसह एमआयएमच्या कार्यकर्त्यांना अटक केली. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.दिल्लीत मंगळवारी समाजकंटकांनी आंदोलन करत खासदार ओवैसी यांच्या निवासस्थानाची तोडफोड केली. तसेच ओवैसी यांना धमकावले आहे. आंदोलकांनी घराबाहेर नेमप्लेट, दिवा आणि खिडकीच्या काचा फोडल्या. यावेळी ओवैसी आपल्या निवासस्थानात नव्हते. या हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी या घटनेला भाजप जबाबदार असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यानंतर बुधवारी धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. एखाद्या खासदाराच्या घरावर अशा प्रकारे हल्ला झाल्यास त्यातून काय संदेश जातो, असा सवाल आमदार फारुक शाह यांनी उपस्थित केला. खासदार ओवैसींना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे. अशा हल्ल्यांनी कुणीही हा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन झाले पाहिजे, अशी मागणीही निवेदनात केली आहे.
मोर्चात आमदार फारुक शाह यांच्यासह नगरसेवक युसूफ मुल्ला, सईद बेग, नासीर पठाण, गनी डॉलर, शहराध्यक्ष नुरा ठेकेदार, महिला जिल्हाध्यक्षा डॉ. दीपश्री नाईक, धुळे महिला शहराध्यक्षा फातेमा अन्सारी, युवा जिल्हाध्यक्ष वसीम अक्रम, युवा अध्यक्ष सेहबाज फारुक शाह, साबीर पत्रकार, अमीर पठाण, साजीद साई, सलीम अन्वर शाह, निजाम सय्यद, राजू भाई, हलीम अन्सारी, आसिफ पोपट शाह, परवेज शाह, रफिक शाह पठाण, शोएब मुल्ला, निसार अन्सारी, माजीद पठाण, इरफान, नजर खान, कैसर पेंटर, चिराग खतीब, शाहीद, सऊद सरदार, जुनेद पठाण, समीर मिर्झा, सलमान खान, युसुफ पिंजारी, समीर शेख, शाकीब हाजी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते
सहभागी झाले होते.