Protest in front of health center for corona vaccination | कोरोना लसीकरणासाठी आरोग्य केंद्रासमोर निषेध

कोरोना लसीकरणासाठी आरोग्य केंद्रासमोर निषेध

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले, कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील त्यांच्या सूचनेनुसार मंगळवारी सकाळी ११ वाजता धुळे तालुका काँग्रेस कमिटीतर्फे धुळे तालुक्यातील मुकटी, कापडणे, सोनगीर, लामकानी, नेर, खेडे, कुसुंबा, आर्वी, शिरूड, बोरकुंड या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आणि या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या उपकेंद्राच्या समोर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. धुळे तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अशोक सुडके तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले़

देशात कोरोना नियंत्रणासाठी केंद्र सरकारने गेल्या तीन महिन्यांपासून लसीकरण कार्यक्रम सुरू केलेला आहे. केंद्र सरकारकडून देशातील सर्व राज्यांना लस पुरवठा करण्यात येतो. प्रारंभीच्या काळात महाराष्ट्रात मिळालेल्या लसीमुळे देशात महाराष्ट्राने लसीकरण मोहिमेत प्रथम क्रमांक मिळविला. मात्र केंद्र सरकारने गेल्या आठवड्यापासून आपले धोरण बदलविले आहे़ महाराष्ट्रापेक्षा लोकसंख्येने लहान असलेल्या इतर राज्यांना जास्तीच्या लसींचा पुरवठा करीत आहे. महाराष्ट्राचा कोटा कमी करण्यात आल्याने राज्यातील लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. केंद्र सरकारच्या या दुजाभाव भूमिकेचा निषेध करण्यात आला़ तसेच लसीकरण केंद्रांना पुरेशा लसींचा पुरवठा करून लसीकरण गतिमान करण्याची मागणी करण्यात आली़

धुळे तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या या निषेध कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा गायत्री जयस्वाल, धुळे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान पाटील, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके, बोरकुंडचे माजी सरपंच बाळासाहेब भदाणे, माजी जि.प़ सदस्य बापू माळी, अविनाश महाजन, जगन बैसाणे, गुलाबराव कोतेकर, लहू पाटील, भगवान गर्दे, बाजीराव पाटील, डॉ. दरबार सिंग गिरासे, अर्जुन पाटील आदी सहभागी होते़

Web Title: Protest in front of health center for corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.