अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे त्वरित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:40 IST2021-09-21T04:40:11+5:302021-09-21T04:40:11+5:30
धुळे : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जलदगतीने पंचनामे करून शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळवून ...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे त्वरित करा
धुळे : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जलदगतीने पंचनामे करून शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करीत शिवेसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर अतिवृष्टीमुळे हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले. परंतु पंचनामे करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. पंचनामे अतिशय संथ गतीने सुरू आहेत, शिवाय काही भागात पंचनामे होत आहेत तर काही भागात पंचनामे होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच नुकसान झाले असताना देखील ५० टक्क्यांच्या वर आणेवारी लावणे चुकीचे आहे. पीक विमा कंपनीच्या बाबतीतही तक्रारी आहेत. नुकसानग्रस्त भागामध्ये विमा कंपनीचे कर्मचारी कोऱ्या अर्जांवर शेतकऱ्यांच्या सह्या घेत आहेत. अनागाेंदी कारभार सुरू आहे. त्याची चाैकशी होणे गरजेचे आहे. विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक कर्ज त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणीही निवेदनात केली आहे.
शेतकऱ्यांच्या या मागण्या त्वरित मान्य न केल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, आधार हाके, विलास चाैधरी, देवराम माळी, गीतेश पाटील, किशोर आढावे, जगदीश पाटील, रवींद्र माळी, अरुण जाट आदी उपस्थित होते.