धुळे : शहरात डेंग्यू व मलेरिया रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. डासांची उत्पत्ती व डेंग्यू नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून सध्या युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र काही नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने डासांची उत्पत्ती वाढत आहे. त्यासाठी महापालिका आता खासगी प्लॉटवर अस्वच्छता किंवा डेंग्यूच्या उत्पत्तीस कारणीभूत दिसून आल्यास अशांवर नोटीस बजावून कारवाई करणार आहे.
डेंग्यूसाठी मनपात कंट्रोल रूम
डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपाच्या जुन्या इमारतीत कंट्रोल रूम तयार करण्यात आला आहे. प्रभागात होणारी डासांची उत्पत्ती, संशयित रुग्ण तसेच ॲबेटिंग व धुरळणीसाठी किंवा अन्य मदतीसाठी नागरिकांना महापालिका आरोग्य विभागाशी संपर्क साधता यावा, यासाठी १८००२३३५०३८ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. या क्रमांकावर नागरिकांनी तक्रार नोंदविल्यास त्या प्रभागाची माहिती ठेकेदाराला पाठवून नागरिकांची तक्रार तातडीने सोडविली जाणार आहे.
नागरिकांना मोफत गप्पी मासे उपलब्ध
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी मलेरिया विभागामार्फत मोफत गप्पी मासे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यात एकूण २३४ गप्पी मासे केंद्र आहेत. त्यात महापालिका क्षेत्रात ३३ तर दोंडाईचा व शिरपूर नगरपालिका क्षेत्रात ६ तसेच अन्य ठिकाणे आहेत. नागरिकांना गप्पी मासे हवे असल्यास त्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.
व्हॉट्सॲपद्वारे घेतली जाते माहिती
महापालिका आरोग्य विभागाला दररोज डेंग्यू बाधित रुग्णांची माहिती मिळावी, यासाठी शहरातील खासगी दवाखान्यांना माहिती देणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी कर्मचारी नियुक्त करून दैनंदिन माहितीसाठी पॅथॉलॉजी लॅब व खासगी रुग्णालयांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे. तसेच फवारणीसाठी शहराचे चार भाग केले आहेत. या भागात ठेकेदाराचे चार, मनपाचे चार पर्यवेक्षक तसेच कर्मचारी किती ठिकाणी, किती वेळ फवारणी करत होते याची माहिती ॲपद्वारे तपासली जाणार आहे.
शहरात २०५ कायम तर २५५ तात्पूर्ती डास उत्पत्ती ठिकाणे
मलेरिया व टायफाॅईड नियंत्रणासाठी उन्हाळा व पावसाळ्यामध्ये डासांची उत्पत्ती ठिकाणी मोजली जातात. यामध्ये शहरात २०५ कायमस्वरूपीचे डास उत्पत्ती ठिकाणे आहेत, तर २५५ ठिकाणी तात्पूर्ती आहेत. यामध्ये केवळ पावसाळ्यातील सांडपाणी डबक्यात किंवा मोकळ्या जागेत जमा होऊन डासांची उत्पत्ती होते.
डेंग्यू नियंत्रणासाठी मनुष्यबळ वाढविले
डेंग्यू व मलेरियावर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपा व खासगी कंपनीचे कर्मचारी शहरात मोहीम राबवीत आहेत. ठेकेदाराला महापालिकेचे २० कर्मचारी देण्यात आले आहेत, तर ठेकेदाराचे ७७ असे एकूण ९७ कर्मचारी सध्या शहरात डेंग्यू नियंत्रणासाठी नियुक्त केले आहेत. नियुक्त कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेतली जाणार आहे तसेच उपाययोजनांची क्रॉस चेकिंग करण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे.