बंदिवानांनी आदर्श नागरिक होण्यासाठी प्रयत्न करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:41 IST2021-08-17T04:41:17+5:302021-08-17T04:41:17+5:30

धुळे : जिल्हा कारागृहाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या तुरुंगात स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी आचार्य विनोबा भावे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, ...

Prisoners should strive to become ideal citizens | बंदिवानांनी आदर्श नागरिक होण्यासाठी प्रयत्न करावेत

बंदिवानांनी आदर्श नागरिक होण्यासाठी प्रयत्न करावेत

धुळे : जिल्हा कारागृहाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या तुरुंगात स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी आचार्य विनोबा भावे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, जमनालाल बजाज, साने गुरुजी यांनी तुरुंगवास भोगला आहे. त्यांचा आदर्श घेत बंदिवानांनी तुरुंगवासानंतर जीवनात आदर्श नागरिक होण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

जिल्हा नियोजन समिती, धुळे यांच्याकडील मंजूर अनुदानातून धुळे जिल्हा कारागृह वर्ग एक येथील बंदिवानांसाठी स्वयंपाकगृहात भोजन सुविधा अद्ययावत करण्यासाठी प्राप्त यंत्रसामग्रीचा उद्‌घाटन सोहळा पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते रविवारी दुपारी पार पडला. यावेळी आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिका आयुक्त अजीज शेख, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, की भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेकांनी बलिदान, त्याग केला. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांपैकी काही जणांना याच कारागृहात बंदिवान म्हणून ठेवण्यात आले होते. बंदिवानांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. कारागृहातील पायाभूत सोयीसुविधांच्या बळकटीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. बंदिवानांची नियमितपणे आरोग्य तपासणी करून घ्यावी. बंदिवानांच्या तक्रारी विहित कालावधीत सोडविण्यात याव्यात, तसेच बंदिवानांनी गुन्हेगारीमुक्त होऊ या असा निर्धार करावा, असेही आवाहन पालकमंत्री सत्तार यांनी केले.

कारागृह अधीक्षक गायकवाड यांनी सांगितले की, धुळे जिल्हा कारागृहाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. याच कारागृहात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असलेल्या बंदिवानांना ठेवण्यात आले होते. कारागृहातील बंदिवानांसाठी अद्ययावत स्वयंपाकगृह कार्यान्वित करण्यात आले आहे. यापूर्वीच कारागृहात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी पारिजात चव्हाण, गायत्री चव्हाण यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. जगदीश देवपूरकर यांनी सूत्रसंचालन केले. तुरुंगाधिकारी श्रीकृष्ण भुसारे, नेहा गुजराथी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी घेतली भोजनाची चव

पालकमंत्री सत्तार यांनी तुरुंगातील विविध कक्षांना भेटी देत आचार्य विनोबा भावे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, साने गुरुजी यांना अभिवादन केले, तसेच त्यांनी स्वयंपाकगृहाला भेट देऊन पाहणी करीत तेथील भोजनाचा आस्वाद घेतला.

रस्ता लोकार्पण सोहळा

पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधा विकास योजनेंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा ते हरणमाळ या रस्त्याचा लोकार्पण सोहळा आज दुपारी पार पडला. यावेळी आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलीस अधीक्षक पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त शेख, सहायक जिल्हाधिकारी धोडमिसे, डॉ. ममता पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Prisoners should strive to become ideal citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.