शहरासह परिसरात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST2021-07-07T04:44:50+5:302021-07-07T04:44:50+5:30
धुळे : शहरासह परिसरात मंगळवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. परंतु काही वेळ बरसलेला पाऊस बंद झाल्याने हिरमोड झाला. उकाडा ...

शहरासह परिसरात पावसाची हजेरी
धुळे : शहरासह परिसरात मंगळवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. परंतु काही वेळ बरसलेला पाऊस बंद झाल्याने हिरमोड झाला. उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
गेल्या महिनाभरापासून लांबलेला पाऊस मंगळवारी सायंकाळी वादळीवाऱ्यासह आला. अर्ध्या तासात काही काळ मुसळधार तर काही वेळ संततधार सुरू होती. त्यानंतर पाऊस बंद झाला. या पावसामुळे आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतशिवारांमध्ये पाऊस झाल्याचे वृत्त नाही. शेतकरी चिंतातुर आहे. पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
अचानक सुरू झालेल्या पावसामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची एकच तारांबळ उडाली. बच्चेकंपनीने मात्र पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला.
मंगळवारी दिवसभर प्रचंड उकाडा होता. दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले होते. पाऊस कमी प्रमाणात झाल्याने उकाडा आणखीनच वाढला. शेतकऱ्यांसह सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
पाऊस पडताच बत्ती गुल
धुळे शहरात पाऊस सुरू होताच नेहमीप्रमाणे वीजपुरवठा खंडित झाला होता. काही भागात तासाभरात तर काही भागात रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. पाऊस सुरू होताच लगेच लाइट कशी जाते, असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला.