यासंदर्भात शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत तसेच वीज अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. वीज वितरण कंपनीडून रोहित्र दुरुस्ती न करता शेतकऱ्यांना विजबिले भरण्याची सक्ती केली जात आहे. ऐनवेळी एवढा पैसा कुठून आणायचा असा प्रश्न उपस्थित करीत शेतकऱ्यांनी सोमवारी थेट वीज कंपनीच्या कार्यालयात धडक दिली. या वेळी शेतकरी आणि वीज अभियंत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त शेतकऱी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देणार आहेत. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, महावितरण कंपनीने कृषी धोरणाच्या नावाने अवेळी शेतकऱ्यांकडून वीजबिलाची वसुली करण्याचे षड्यंत्र रचले आहे. शेतकऱ्यांनी आपली सर्व जमापुंजी पीक संवर्धनासाठी वापरलेली आहे आणि अश्यावेळी शेतकऱ्यांना कमी दाबाचा वीजपुरवठा केल्याने रोहित्र जळण्याचे प्रकार वाढले आहे. नवीन रोहित्रासाठी विजबिले भरण्याचा हट्टहास शेतकऱ्यांपुढे मांडला जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची बाजू कमकुवत असल्या कारणाने सावकारी कर्जाच्या खाईत शेतकरी लोटला जात आहे. पिके पाण्याअभावी करपत आहे. तरी नादुरस्त रोहित्र दुरुस्त करून वीजबिलाची वसुली करावी. त्यासाठी शेतकऱ्यांना पिके निघेपर्यंत सवलत द्यावी. शेतकऱ्यांना दुहेरी संकटात टाकून नये, असे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे. निवेदनावर सतीश बोढरे,तुषार सैदाणे, कैलास माळी, विठ्ठल गवळे, भगवान माळी, रवी गवळे या शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
रोहित्र दुरुस्त न करता वीजबिलची वसुली करण्यावरून वीज कंपनी अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:53 IST