शिंदखेडा-वरुळ घुसरे रस्त्यावर साचले तळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 13:06 IST2020-08-03T13:05:59+5:302020-08-03T13:06:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिंदखेडा : रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे शिंदखेडा- वरुळ घुसरे रस्त्याला अक्षरश: नदीचे ...

शिंदखेडा-वरुळ घुसरे रस्त्यावर साचले तळे
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे शिंदखेडा- वरुळ घुसरे रस्त्याला अक्षरश: नदीचे स्वरूप आले होते. येथील नाला पूर्णपणे बंद झाल्याने शेत शिवारातील संपूर्ण पावसाचे पाणी रस्त्यावर येत असल्याने पंचायत समिती बांधकाम विभागाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मुसळधार पावसामुळे पंचायत समितीजवळील वरूळ रस्त्यावर तळे साचले होते. शिंदखेडा अर्धे शहर याच रस्त्यावरील सिद्धी कॉलनी, प्रोफेसर कॉलनी, इंदिरा कॉलनी, लालचंद नगर, बी.के. देसले नगरसह चार ते पाच कॉलनी परिसरात राहतात. दरवर्षी पावसाळ्यात कॉलनीतील रहिवासी, शेतकरी व वरुळ घुसरे येथे जाणाऱ्या ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर पाण्यामुळे वाहनधारकांचेही खूपच हाल झाले. सदर रस्ता पंचायत समितीच्या बांधकाम विभागाअंतर्गत येतो. गेल्यावर्षी नगरपंचायतने रस्त्याच्या साईडला गटार केली. मात्र सदर गटारीत पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने पाणी रस्त्यावर येते. यासाठी पं.स. बांधकाम विभागाने येथे मोठी गटार करावी, अशी मागणी होत आहे.