पाण्याअभावी डाळींब बाग करपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 11:48 IST2019-05-21T11:47:39+5:302019-05-21T11:48:15+5:30
मालपूर परिसर : उन्हाने गाठला उच्चांक, उद्ध्वस्त झालेल्या बागेमुळे शेतकरी हवालदिल

dhule
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरातील डाळींबाची बाग पाण्याअभावी करपून गेली आहे. यावर्षी उन्हाने उच्चांक गाठल्याने उष्णतेमुळे बाग पुन्हा बहरेल, याची शक्यताही उरलेली नाही.
दुष्काळाच्या झळांची तीव्रता मालपूरसह परिसरात दिवसेंदिवस वाढत असून हा दुष्काळ चारा, पाण्यापुरता मर्यादित राहिला नसून जीवापाड जपलेल्या शेत शिवारातील बागा देखील उद्ध्वस्त करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दोंडाईचा-मालपूर रस्त्याच्या आजुबाजूला मालपूर शिवारातील डाळींब बाग, आवळा बाग व सिताफळ बाग पाण्याअभावी नुसत्या करपल्याच नाहीत तर सुकून गेल्या आहेत.
पाण्याचा प्रश्न मालपूरसह परिसरातील गावांमध्ये गंभीर झाला आहे. याचा फटका आता दिर्घमुदतीच्या फळबागा पिकांपर्यंत येऊन पोहाचल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. रानावनात जनावरांचा चारा संपुष्टात आल्याने शेतकरी आधीच हैराण झाले आहे. त्यात वर्षानुवर्ष उत्पन्न मिळवून देणाºया फळबागा देखील डोळ्यादेखत उन्हामुळे खाक झाल्यामुळे आता शेती करायची उमेदच शिल्लक राहिली नसल्याची प्रतिक्रीया शेतकºयांकडून व्यक्त होत आहे.
यावर्षी तुलनेने कमी पाऊस झाला. आॅगस्ट महिन्यातील दोन दिवसाचा पाऊस सोडला तर त्यानंतर पाण्याचा थेंबही पडला नाही. गेलेला पाऊस पोळ्याला हमखास येतो, असे अनुभवी शेतकरी सांगतात. मात्र, यंदा ही अपेक्षाही फोल ठरल्यामुळे विहिरींना पाणीच आले नाही. ओहोळ, लहान मोठे जलयुक्त बंधारे दोन वर्षांपासून कोरडे आहेत. तसेच अमरावती मध्यम प्रकल्पात १४ वर्षांपासून ठणठणाट आहे.
शेतकºयांनी सुमारे पाच वर्षांपूर्वी शेकडो हेक्टरवर डाळींब, सिताफळ, आवळा बागांची लागवड करुन जोपासना केली होती. मात्र, यावर्षीच्या दुष्काळात या बाग वाळून गेल्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकºयांनी अगोदर टँकरद्वारे पाणी देऊन या बागा जगविण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, टँकर भरुन आणणे देखील आता शक्य नसल्याने नाईलाजस्तव सोडून द्यावे लागत आहे. डाळींबास कळी लागली. मात्र, डाळींब तयार होण्यास सुरुवात होताच पाणी कमी पडल्याने फळांसह बागा सुकून गेल्या, असे शेतकयांनी सांगितले.