मातब्बरांची राजकीय प्रतिष्ठा लागली पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:24 IST2021-07-04T04:24:28+5:302021-07-04T04:24:28+5:30
एकूणच निवडणुकीत चुरस निर्माण होत आहे. निवडणुकीच्या मैदानात अनेक मातब्बरांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात धुळे तालुक्यात भाजपचे ...

मातब्बरांची राजकीय प्रतिष्ठा लागली पणाला
एकूणच निवडणुकीत चुरस निर्माण होत आहे. निवडणुकीच्या मैदानात अनेक मातब्बरांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात धुळे तालुक्यात भाजपचे भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे, माजी जि.प. सभापती रामकृष्ण खलाणे, प्रा. अरविंद जाधव, संग्राम पाटील यांची नावे प्रमुख आहेत. हे सर्व उमेदवार दीड वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत विजयी झाले होते. हे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरतील, हे जवळपास नक्की आहे. यांच्यासमोर तेवढ्याच तुल्यबळाचा तगडा उमेदवार देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतर्फे प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीत या नेत्यांच्या विरोधात महाविकास आघाडी करून एकास एक उमेदवार देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासंदर्भात राजकीय खलबतेही होत आहेत.
धुळे तालुक्यात राष्ट्रवादीतर्फे माजी जिल्हाध्यक्ष किरण गुलाबराव पाटील हे कुठून उमेदवारी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ते गेल्या वेळेस आर्वी गटातून पराभूत झाले होते. यावेळी ते कुसुंबा, कापडणे या दोन गटांतून एका ठिकाणाहून उमेदवारी करण्याची चर्चा सध्या सुरू आहे. या निवडणुकीत त्यांना निवडून येऊन राजकारणात कमबॅक करण्याची संधी आहे. त्यामुळे ते नेमके कुठून उमेदवारी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ते कुठूनही उभे राहिले तरी त्यांना भाजपतर्फे कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल, हेही तेवढेच खरे आहे.
शिंदखेडा तालुक्यातही भाजपचे उमेदवार जवळपास निश्चितच आहेत. भाजपतर्फे मालपूर गटात कोणाला उमेदवारी दिली जाते, याबाबत उत्सुकता आहे. मालपूरमधून भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यांच्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकास एक उमेदवार देतात की स्वतंत्र उमेदवार उभे करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. तालुक्यात काँग्रेसतर्फे खलाणे गटात गेल्यावेळेस सार्वेचे शरद पाटील यांना काँग्रेसमधील बंडखोरीमुळे पराभव पत्कारावा लागला होता. यंदा शरद पाटील हे उमेदवारी करतील याबाबत अनिश्चितता आहे. त्यांनी उमेदवारी केली नाही तर काँग्रेस तेथून कोणाला उमेदवारी देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
राजकीय प्रतिष्ठा पणाला - ही निवडणूक धुळे व शिंदखेडा तालुक्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत पक्षात घरवापसी करणारे माजी आमदार प्रा. शरद पाटील या दोघांमुळे धुळे तालुक्यात बळ मिळणार आहे. त्याचा फायदा या निवडणुकीत किती होतो हे निकालानंतर जाहीर होणार आहे, तसेच शिंदखेडा तालुक्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर आणि ज्येष्ठ नेते डाॅ. हेमंत देशमुख यांची ताकद मालपूर गट शाबूत राखून अन्य गट ही खेचून आणतात का, हासुद्धा चर्चेचा विषय आहे.
भाजपचे माजी मंत्री आमदार जयकुमार रावल हे भाजपचे गट शाबूत ठेवून मालपूर गट आपल्याकडे खेचून आणतात का, याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे. धुळे तालुक्यात माजी जि.प. सदस्य व गेल्या वेळेस सर्वाधिक मतांनी विजयी झालेले भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे हे पुन्हा तो करिश्मा घडवू शकतील का, तसेच त्यांच्यासोबत माजी जि.प. सभापती बापू खलाणे, माजी जि.प. सदस्य प्रा.अरविंद जाधव, शंकर खलाणे आणि संग्राम पाटील हे पुन्हा विजयश्री खेचून आणतात का, याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे. वरील सर्वच मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.