जिल्ह्यात 1 लाख 91 हजार बालकांना देणार पोलिओ डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 21:30 IST2020-12-13T21:29:41+5:302020-12-13T21:30:42+5:30
जिल्हाधिकारी : लसीकरण करताना कोरोनाबद्दल काळजी घेण्याचे आवाहन

dhule
धुळे : जिल्ह्यात १७ जानेवारी २०२१ रोजी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पल्स पोलिओचे डोस देण्यात येतील. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने दक्षता बाळगावी. लस देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करून घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले.
जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार ६६४ बालकांना पोलिओ डोस देण्यात येतील. या मोहिमेचे आरोग्य विभागाने परिपूर्ण नियोजन करावे. पोलिओ उच्चाटनासाठी एकही बालक डोस घेण्यापासून वंचित राहू नये, याची खबरदारी पर्यवेक्षीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी. बसस्थानकावरील प्रवासी, स्थलांतर करणाऱ्या मजुरांच्या बालकांना पोलिओ डोस देण्याचे नियोजन करावे.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड १९ लसीकरण आणि १७ जानेवारी रोजी राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी गठित टास्क फोर्सची बैठक झाली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, डॉ. शिवचंद्र सांगळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे आदी उपस्थित होते.
कोविड १९ लसीकरणाची पूर्वतयारी करावी. लसीकरणाचा आराखडा आणि नियोजन अचूक होईल याची खात्री करावी. तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठित करावा. तालुका आरोगय्अधिकाऱ्यांनी पोलिस, शिक्षण, अंगणवाडी, ग्रामपंचायत, समाजकल्याणसह शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे.
याशिवाय नागरिकांमध्ये जनजागृती करावी. लसीकरणासाठी आवश्यक डेटा अद्ययावत करावा, आवश्यक साधनसामग्रीची पडताळणी करून घ्यावी, असेही त्यांनी निर्देश दिले.
महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे, समन्वयक अमित राजपूत यांनी पल्स पोलिओ मोहिमेच्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली.