पोलिसाला झाली धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 22:13 IST2019-08-26T22:07:06+5:302019-08-26T22:13:32+5:30
पेटले गावातील घटना : १७ जणांविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल

पोलिसाला झाली धक्काबुक्की
धुळे : एका जणास मारहाण करत असताना त्यास सोडविण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाºयाची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याची घटना साक्री तालुक्यातील पेटले गावातील पाण्याच्या टाकीजवळ घडली़ याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात १७ जणांविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली़
निजामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी वामन मंगल्या चौधरी यांनी फिर्याद दिली आहे़ त्यानुसार, साक्री तालुक्यातील पेटले गावातील पाण्याच्या टाकीजवळ रामभाऊ राजू पवार (ता़ जामदा ता़ साक्री) याला शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास एका जमावाकडून मारहाण केली जात होती़ घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ पोलिसांनी हा वाद मिटविण्याचा आणि पवार याला जमावाकडून सोडविण्याचा प्रयत्न केला़ याचा राग येऊन उलट जमावाने शासकीय कामात अडथळा निर्माण केला़ शासकीय गणवेशाची कॉलर पकडून धक्काबुक्की केली़ या घटनेमुळे पेटले गावात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती़
या घटनेनंतर रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास पोलीस कर्मचारी वामन मंगल्या चौधरी यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ त्यानुसार, विजू गरमक राठोड, गोरख भाईदास राठोड, बढीराम कुका राठोड, मेरचन कुका राठोड, भैय्या चेतराम पाटील, वजू सुका राठोड, इंदल गरकम राठोड आणि अन्य अनोळखी ८ ते १० इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली़ त्यांच्या विरोधात भादंवि कलम ३५३, १४३, ३२३, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला़ सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ घटनेचा तपास करीत आहेत़ पेटले गावात सध्या तणावाचे वातावरण आहे़
दरम्यान, पोलिसांवर हात उगारण्याची घटना घडल्याने आता हे प्रकरण गांभिर्याने घेण्याची आवश्यकता आहे़ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे़